इस्त्रोने प्रक्षेपित केले 28 विदेशी उपग्रह

श्रीहरीकोटा – भारतीय अंतरीक्ष संस्था म्हणजेच इस्त्रोने आज ईमीसॅट या लष्करी उपग्रहासह 28 विदेशी उपग्रह अंतरीक्षात प्रक्षेपित केले. इस्त्रोच्या पीएसएलव्ही – सी 45 या रॉकेटच्या मार्फत हे उपग्रह आज अंतरीक्षात प्रक्षेपित करण्यात आले. या रॉकेटची अंतरीक्षातील ही 47 वी फेरी होती. या रॉकेटद्वारे ईमीसॅट नावाचा जो उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे त्याचे वजन 436 किलोचे आहे. इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक फिल्डचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह वापरण्यात येणार आहे. त्या खेरीज लिथूनिया, स्पेन, स्वीत्झर्लंड आणि अमेरिका या देशांचे एकूण 28 उपग्रह अंतरीक्षात सोडण्यात आले आहेत.

विदेशातील या 28 छोट्या उपग्रहांचे एकूण वजन 220 किलो इतके आहे. 27 तासांच्या उलट गणतीनंतर सकाळी 9 वाजून 27 मिनीटांनी हे प्रक्षेपण झाले ते अपेक्षेनुसार यशस्वी झाल्याची घोषणा इस्त्रोकडून करण्यात आली आहे.ईमीसॅट हा उपग्रह उड्डाणानंतर 17 व्या मिनीटांत त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आला. ही कक्षा 748 किमी अंतरावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. या उड्डाणाबद्दल माहिती देताना इस्त्रोच्या या मोहीमेचे प्रमुख के सिवान यांनी सांगितले की यावेळच्या प्रक्षेपणात तीन नवीन प्रयोग केले गेले आहेत. त्यातील एक महत्वाचा प्रयोग म्हणजे यावेळी प्रथमच रॉकेट द्वारे अंतरीक्षातील तीन वेगवेगळ्या कक्षांमध्ये एकाच वेळी उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत. यावेळच्या मोहीमेत भारतीय उद्योगांनीही महत्वाची भूमिका बजावली असून या मोहीमेतील 95 टक्के हार्डवेअर आणि उपकरणे इस्त्रोच्या बाहेरून तयार करण्यात आली आहेत. खुद्द उपग्रहाचे 60 ते 70 टक्के भाग इस्त्रोच्या बाहेर बनवण्यात आले आहेत.

या मोहीमेनंतर मे महिन्यापासूनही अनेक नवीन मोहीमा इस्त्रो मार्फत हाती घेतल्या जाणार आहेत. त्यात रिसॅट 2 बी, कार्टोसॅट 3 हे उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत.

Leave a Comment