कलंदर: दिन दिन दिवाळे…

उत्तम पिंगळे

नुकताच एक मे ला महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा झाला. मी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो होतोच त्यांनी मला काही वास्तव गोष्टी दोन्ही बाबत सांगितले. महाराष्ट्र दिनाचा विचार केल्यास 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र गुजरात या दोन राज्यांची मुंबई प्रांतातून निर्मिती झाली. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीमुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यासाठी 106 जणांना हुतात्मा व्हावे लागले.

मागे वळून पाहताना त्या वेळी महाराष्ट्राची साक्षरता तीस टक्‍क्‍यांच्या आसपास होती. आता ती शहरी भागात 90 व ग्रामीण भागात 80 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. म्हणजेच शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राने निश्‍चितच प्रगती केलेली आहे. पण शिक्षणाच्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये तेवढा रोजगार निर्माण झाला आहे का? हे पाहणे निश्‍चितच महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र व गुजरात ही दोन्ही राज्य औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली गेली. आपण पाहतोच मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या विविध ठिकाणी उद्योग निर्माण झालेले आहेत तसेच अनेक परप्रांतीयही येथे नोकऱ्या करीत आहेत.

महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणात मुंबईचे महत्त्वाचे स्थान आहे. कारण मुंबईची भौगोलिक परिस्थिती. ते एक नैसर्गिक बंदर आहे. तसेच नंतर तिच्या बाजूलाच नाव्हा शेवा पोर्ट ट्रस्ट बंदर उदयास आले. त्यामुळे व्यापार उदीम वाढला व मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी बनली. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र साकारलेला आहे का? हा प्रश्‍न प्रत्येकाने विचारावयास हवा. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांसाठी म्हणून राज्य उदयास आले, मग असे असताना एवढी वर्षे होऊन गेली पण बेळगाव, कारवार, निपाणी ही मराठी भाषिक नगरे अजून कर्नाटकातच आहेत. आज आपण पाहतो की एकाच भाषेतील राज्येही विभागली गेली जसे उत्तर प्रदेश-उत्तरांचल, बिहार-झारखंड, मध्यप्रदेश-छत्तीसगड व अलीकडेच आंध्र प्रदेश-तेलंगणा. पण आपण आपली मराठी भाषिक गावे महाराष्ट्राला आजही जोडू शकलो नाहीत हे वास्तव आहे.

आता आपण सिंचन क्षेत्राकडे वळूया. आपण पाहतो की विविध शहरांमध्ये मेट्रोचे काम जोरदारपणे सुरू आहे; पण सिंचनाचे काय? कित्येक प्रकल्प रखडले आहेत व ते पूर्ण करावयासाठी प्रचंड पैसा मोजावा लागणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण आपल्या राज्याला धड पिण्याचे पाणीही नीटपणे देऊ शकत नाही हे भीषण वास्तव आहे. 2018 मध्ये 2,761 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर 2017 मध्ये 2,917 म्हणजे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही विशेष कमी झालेले नाही. कोकणात भरपूर पाऊस पडत असतानाही आपण तेथे पाणी साठवू शकत नाही त्यामुळे ताबडतोब ते पाणी समुद्रात जाऊन मिळते. मे महिन्यात तर कोकणातही काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष होत असते.शेतकऱ्याला वीज व पाणी मुबलक मिळाल्यास आत्महत्या करण्याची गरजच पडणार नाही. पण तेही आपण देऊ शकत नाही.

सामाजिकदृष्ट्या आपण प्रतिगामी तर होत नाही ना? कित्येक संतांनी सोप्या भाषेच्या त्या वेळी अशिक्षित असलेल्या जनतेला दिशा दिली. एकोप्याने राहा, राज्य व पर्यायाने देश संपन्न करा, असे असताना आज उच्चशिक्षित नेतेही जनतेत फूट पाडून आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल ते पाहात आहेत. मग त्यासाठी काहीही मुद्दे काढत आहेत जसे जात, धर्म, प्रदेश व अगदी पेहरावातील वस्तूही. केवळ उद्योग व पैसा यांनी राज्य संपन्न होत नसते. आपले राज्य त्या राज्याची भाषा तसेच राज्याचा एकजिनसीपणा व परस्परांमधील सौजन्य यांनीच राज्य पुढारले जाते. कामगारदिनाविषयी उत्तरार्धात बोलू.
(पूर्वार्ध)

Leave a Comment