गैरव्यवहारांची “खिचडी’ शिजणे बंद

पोषण आहाराची बिले यापुढे शिजवलेल्या अन्नाच्या वजनानुसारच

– डॉ.राजू गुरव

पुणे – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अनुदानाचा अपव्यय टाळण्यासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत (सेंट्रल किचन) शहरी भागातील शाळांना शिजवलेल्या अन्नाचे वजन करुनच पुरवठा करण्यात येत आहे. या वजनानुसारच बिले अदा करण्यात येणार आहेत. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांची बचतही होणार आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील व सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. राज्यातील एकूण 86 हजार 440 शाळांमधील 98 लाख 50 हजार विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. अनेक वर्षांपासून महिला बचत गटांमार्फतच विद्यार्थ्यांना आहार पुरविला जात होता. आता शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनद्वारे आहार पुरवण्यात येत आहे. पुणे शहरात 20 सेंट्रल किचन सुरू आहेत. याद्वारे 640 शाळांमधील 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यात येतो आहे. पूर्वी 250 बचत गटांमार्फत आहार पुरविला जात होता. पिंपरी-चिंचवडमध्ये 11 सेंट्रल किचन सुरू आहेत. अन्न शिजवताना भाजीपाला, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो व इतर साहित्याचा संस्थेला स्वखर्चाने वापर करणे अनिवार्य आलेले आहे. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना प्रति दिन 400, तर उच्च प्राथमिकमधील विद्यार्थ्यांना प्रति दिन 700 ग्रॅम वजनाचा तयार आहार पुरवठा केला जातो. पूर्वी सरसकट विद्यार्थी संख्येनुसार आहार पुरविला जायचा. त्यामुळे हिशेब लागत नव्हता.

चुकीच्या कारभाराला “चाप’ शक्‍य
सेंट्रल किचनची संख्या मर्यादित असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे अधिकाऱ्यांना शक्‍य होत आहे. कोणत्या केंद्राकडून कोणत्या दर्जाचा अन्न पुरवठा केला जातो, हे समजून येते. अन्नाच्या दर्जाबाबत काही चुकीचा कारभार आढळल्यास त्याला चापही बसविण्याची कार्यवाही करता येते. स्वच्छतेची तपासणीही करण्यात येते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment