पुणे – नालेसफाईबाबत क्षेत्रीय कार्यालये उदासिन

निविदा आणि कामे सुरूच झाली नाहीत


काहीच क्षेत्रीय कार्यालयांनी वरवरच्या सफाईला केली सुरूवात


प्रत्यक्ष कामांना सुरूवात मे अखेरपर्यंत होण्याची शक्‍यता

पुणे – महापालिका प्रशासनाने 7 जूनच्या आधीच म्हणजे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करणे अनिवार्य असताना, एखादे क्षेत्रीय कार्यालय सोडल्यास अन्य कार्यालयांतर्फे अद्याप याच्या निविदाच काढल्या नाहीत. त्यामुळे ही नालेसफाईची कामे आता मे अखेरपर्यंत तरी पूर्ण होतील की नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे.
पावसाळी कामे म्हणजे नालेसफाईची कामे अत्यावश्‍यक बाबीत मोडत असल्याने आचारसंहितेच्या कचाट्यात ती नव्हती. पावसाळ्याआधी ती सुरू होणे आवश्‍यक होते. त्यासाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फार तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू करणे आवश्‍यक होते. हे “शॉर्ट टेंडर’ असल्याने 7 दिवसांची निविदा प्रक्रिया राबवून ही कामे देण्यात येतात. मात्र, अद्याप निविदाच झाली नसल्याने ठेकेदारांना कामेच देण्यात आली नाहीत.

परिमंडळ 5 अंतर्गतच फक्त निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यांचीच कामे फक्‍त 15 ते 17 मे दरम्यान सुरू होण्याची शक्‍यता आहे. पावसाळी लाईन टाकणे, नालेसफाई, पावसाळी जाळ्या स्वच्छ करणे ही आणि तत्सम कामे आतापर्यंत किमान अर्धी तरी उरकणे आवश्‍यक होते. आचारंसहितेचे कारण पुढे करून ही कामेही पुढे गेल्याने आता ती अर्धवट राहतील की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे.

सुमारे तीनशे किमीची नाले सफाईची कामे करावी लागणार आहेत. या कामाच्या निविदा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर काढण्यात येणार होत्या. कोणती कामे करायची याच्या याद्या अद्याप पूर्णपणे तयार नसल्याने याच्या निविदा प्रसिद्धीला दिल्या गेल्या नाहीत. जेथे शक्‍य आहे तेथे महापालिकेच्याच जेसीबीच्या सहाय्याने कचरा काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, जेथे मनुष्यबळाच्या सहाय्याने काम करायचे आहे तेथे ठेकेदार नेमणे आवश्‍यक आहे. तसेच चेंबर आणि अवघड ठिकाणी स्पायडर मशीनच्या सहाय्याने गाळ काढणे, सफाई करणे आवश्‍यक असते. त्यामुळे ती कामे निविदा काढून करावी लागतात.

दरवर्षी या कामांविषयी नाराजी व्यक्त केली जाते कारण नाले भरून आजूबाजूला गाळ आणि पाणी शिरतेच. त्यातून आता सफाईलाच उशीर झाल्याने त्याच्या व्यवस्थित काम होण्याबाबतच शंका निर्माण झाली आहे.

Leave a Comment