पुणे – विविध भागांतील नालेफसाईला वेग

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पावसाळापूर्व कामे होण्यास तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर आत महापालिका प्रशासनाने नाले आणि पावसाळी गटारे, ड्रेनेज सफाई करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात या कामाची गती वाढवण्यात आली असून महिनाअखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

पावसाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी महापालिकेच्या वतीने खड्डे दुरुस्ती करणे, पावसाळी लाईन टाकणे, नालेसफाई करणे, खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करणे, दुभाजक, पदपथ दुरुस्ती करणे, रस्त्यावरील व ओढे-नाल्यांमधील राडारोडा काढणे आदी पावसाळापूर्व कामे केली जातात. ही कामे अत्यावश्‍यक कामांपैकी आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करून या वर्षाची ही कामे अद्याप सुरू केली नव्हती.

दुसरीकडे कात्रज तलावापासून वाहणाऱ्या आंबिल ओढा, भैरोबा नाला, शिवाजीनगर परिसरातील ओढा, हिंगणे खुर्द व आनंदनगर परिसरातील नाला, कोथरूड, कोरेगाव पार्क परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा आणि चिंध्यांचे साम्राज्य आहे. यावरून प्रशासनावर टीका झाल्यानंतर नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत.

पालिकेच्या पाचही परिमंडलांतर्गत पावसाळापूर्व कामे केली जात आहेत. यामध्ये नालेसफाई, पावसाळी नाल्यांची सफाई, अडथळा ठरणारे डबर, राडारोडा हलविणे, पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरिता सफाईकामे, पावसाळी वाहिनीमधील अडथळे, राडारोडा काढणे आदी कामे केली जात आहेत. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment