पाच वर्षांत 1.29 कोटी मतदारांनी वापरला नोटा

नवी दिल्ली –लोकशाहीत लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाते. नागरिक इलेक्‍ट्रॉनिक मशीनवरील आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबून त्याला मत देतात. मात्र काही वेळेस पसंतीचा एकही उमदेवार नसेल तर काय करायचे? त्याचीही सोय मतदान यंत्रात करण्यात आली आहे. त्यात नोटा म्हणजे कोणालाच मत नाही असे एक बटन दिले गेले आहे. ते मतदाराला दाबता येते. आता गेल्या पाच वर्षांत भारतात नोटाचे बटन किती वेळा दाबले गेले याचाच अर्थ नोटाला किती मते पडली याची आकडेवारी समोर आली आहे.

एडीआरने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षांत 1.29 कोटी मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. एडीआर म्हणजे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स मतदानाचा अधिकार आणि याबाबतच्या कायद्यांच्या अमलबजावणीवर लक्ष ठेवणारी संस्था आहे. त्यांनी आता नोटाच्या संदर्भातील आपला अहवाला जारी केला आहे. 2018 ते 2022 या काळात देशात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांच्या मतदानाचे त्यांनी विश्‍लेषण केले आहे.

त्यानुसार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानात नोटाला 64,53,652 मते अर्थात 64.53 लाख मते मिळाली आहेत. तर लोकसभा निवडणुकीत नोटाला सगळ्यांत जास्त मते बिहारच्या गोपालगंज मतदारसंघात मिळाली आहेत. येथील 51,660 मतदारांनी हे बटन दाबले होते. नोटाचा सगळ्यांत कमी वापर लक्षद्वीप मतदारसंघात केला गेला. येथे केवळ 100 जणांनीच नोटाचे बटन दाबले.
राजधानी दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 43,108 जणांनी नोटा वापरला. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत 7,06,252 मते नोटाला मिळाली.

2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक झाली. या पाच राज्यांत 8,15,430 लोकांनी नोटाचा अधिकार वापरला. टक्केवारीचा हिशेब करायचा झाला तर केवळ 0.70 टक्के लोकांनी नोटाचा पर्याय वापरला आहे. त्यात उत्तर प्रदेशात 6,37,304, पंजाबमध्ये 1,10,308, उत्तराखंड 46,840, गोव्यात 10,629 तर मणिपूरमध्ये 10,349 नागरिकांनी नोटाचा पर्याय वापरला.

महाराष्ट्रात विधानसभेत जास्त वापरला पर्याय
महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत नोटाचा सगळ्यांत जास्त वापर करण्यात आला. या निवडणुकीत नोटाला 7,42,134 मते मिळाली.