रस्ते आणि शाळांसाठी सव्वादोन कोटींचा निधी

सणबूर  -महाराष्ट्र खनिज विकास निधी अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेतून पाटण मतदारसंघातील रस्ते व जिल्हा परिषद शाळेतील कामांसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ना. देसाई यांच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, रस्ता सुधारणा कामांमध्ये कोंजवडे ते सवारवाडी 50 लाख, माजगाव ते ऊरुल 1 कोटी 25 लाख, चेवलेवाडी 25 लाख, तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोयनानगर शाळा 5 लाख, कामरगाव 5 लाख, ऐनाचीवाडी 5 लाख, पाडळी, ता. कराड 5 लाख या विकासकामांचा समावेश आहे. लवकरच अंदाज पत्रक व निविदिा प्रक्रिया मंजूर होऊन सदरच्या कामांना सुरुवात करण्यासंदर्भात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याचेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.