अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला आहे. दंडापैकी पाच हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सोमदत्त नंदू खरारे ऊर्फ डो भाई असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित 16 वर्षीय मुलीने मार्केट यार्ड पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. त्यांना पैरवी अधिकारी चंद्रशेखर परदेशी, उपनिरीक्षक देशमुख,पोलीस कॉन्स्टेबल राम धनवडे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.

२०१६ मध्ये हा प्रकार घडला. सोमदत्त हा पीडितेच्या ओळखीचा होता. तो तिला फोन करत असत. बोलत असत. त्यानंतर खडकवासला येथे दुचाकीवर नेले. तेथील एका खोलीवर नेवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने बलात्काराच्या कलमानुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. न्यायालयाने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

 

Leave a Comment