दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि.20) पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

माध्यमिक शाळांनी सरल डेटाबेसवरून परीक्षा अर्ज भरावे लागणार आहे. माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र, प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषयक घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट घेणारे विद्यार्थी आदींचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाईन भरण्यात येणार आहेत. 20 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा सुरुच राहणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन सबमिट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीत माध्यमिक शाळांच्या लॉगीनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल.

माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जाच नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सर्व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक त्या सूचना विचारात घेणे आवश्‍यक आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

मार्च 2024 मधील परीक्षेसाठी मार्च 2023 अथवा जुलै-ऑगस्ट 2023 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापुर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यास श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आली आहे.