nagar | आचार संहिता भंगाच्या ११४ तक्रारी

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचार संहिता नियंत्रण कक्षाकडे आतापर्यंत ११४ तक्रारी आल्या आहेत. या सी-व्हिजिल ॲपवरील शंभर टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. ई-मेल आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन दिलेल्या तक्रारींपैकी ९० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम दि.१६ मार्च रोजी जाहिर केला. तेव्हापासूनच आचार संहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाल्यावर स्थानिक प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील राजकीय पक्षांचे फलक, विकास कामांच्या कोनशीला झाकण्यासाठी भरारी पथके स्थापन केले. खासगी मालमत्तेवर राजकीय पक्षांचे चिन्ह, फलक असल्यास ते काढून टाकण्याची जबाबदारी संबंधितांवर होती.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विना परवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहणे, निवडणूक चिन्ह लिहणे, कापडी बॅनर, अथवा फलक लावणे, झेंडे लावणे इतर कारणाने मालमत्ता विद्रुपीकरण करण्यावर बंदी घातली आहे. ज्या राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांनी सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, भिंत पत्रके तातडीने हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

निवडणूक आयोगाने आचार संहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांना करण्यासाठी सी-व्हिजिल ॲप, ई-मेल, टोल फ्री क्रमांक आणि प्रत्यक्ष तक्रार दाखल करण्याचे चारही पर्याय उपलब्ध करून दिले होते. नागरिक तक्रार करण्यासाठी सर्वाधिक पसंती सी-व्हिजिल ॲपला देत आहेत. या ॲपवर ८१ तक्रारी आल्या आहेत. या ॲपवरील तक्रारीचे १०० तासांमध्ये निवारण करणे बंधनकारक आहे.

या ॲपवर तक्रार केल्यानंतर जिल्हा आचारसंहिता कक्षात प्राप्त होते. ही तक्रार ज्या भागातील आहे. त्या भागातील भरारी पथकाला ही तक्रार खात्री करण्यासाठी पाठविली जाते. भरारी पथक हे पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी जाऊन खात्री करतात. तक्रारीच्या निराकरणासाठी योग्य ती कार्यवाही करतात. त्याबाबतचा अहवाल सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविला जातो. त्याच्या मान्यतेने तक्रारीचे निवारण झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला जात आहे.