राज्यातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी 1182.86 कोटी मंजूर

मुंबई – राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1182.86 कोटी रुपये खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून 208.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

तसेच, कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाशा या शहरांमध्ये आतापर्यंत प्रतिदिन 260 दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्यात आली आहे.

जलशक्ती मंत्रालय राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेद्वारे, गंगा नदी आणि तिच्या उपनद्या वगळता नद्यांच्या निश्‍चित केलेल्या भागांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करत आहे,

शहरांमधून प्रक्रिया न केलेले किंवा अंशतः प्रक्रिया केलेले सांडपाणी आणि त्यांच्या संबंधित पाणलोट क्षेत्रात औद्योगिक सांडपाणी सोडल्यामुळे देशातील नद्या प्रामुख्याने प्रदूषित होतात. प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी हे जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर आवश्‍यक प्रक्रिया करणे ही राज्यांची आणि औद्योगिक कंपन्यांची जबाबदारी आहे.

नद्यांची स्वच्छता ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती नैसर्गिक घटकांवरही अवलंबून असू शकते. जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.