1,680 दिव्यांग आणि ज्येष्ठांना महापालिकेकडून घरपोच मदत

पुणे – लॉकडाऊनमुळे शहरातील दिव्यांग व्यक्‍ती आणि ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुरू केलेल्या मदत कक्षातून आतापर्यंत 1,680 जणांना घरपोच अन्नधान्य किट पोहोचवली आहे. तर 14 जणांनी ही मदत नाकारली आहे.

ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना वैद्यकीय उपचार तसेच अत्यावश्‍यक सुविधांसाठी लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. परिणामी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्याकडून मदतीसाठी पालिकेस साकडे घातले जात होते. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र कक्ष उभारला होता. तसेच स्वयंसेवी संस्थांनी या कक्षाच्या माध्यमातून मदत द्यावी, अशी विनंती केली होती. हा कक्ष सुरू केल्यानंतर आतापर्यंत 1,880 जणांनी अन्नधान्य मदत मागितली होती, अशी माहिती या कक्षाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी दिली.

मदतीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न
महापालिकेच्या या मदतीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही झाल्याचे दिसून आले. पालिकेस आलेल्या मदतीच्या कॉलमध्ये सुमारे 14 कुटुंबांतील सधन व्यक्‍तींनी मदतीसाठी फोन केले होते. ही मदत देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी संबंधित व्यक्‍तींच्या घरी पोहोचताच अनेक जणांचे बंगले तसेच स्वतःची मोठी घरे होती. काहींच्या दारात गाड्याही होत्या. त्यामुळे संस्थांच्या प्रतिनिधींनी या व्यक्‍तींना समजावून सांगत मदत दिली नाही.

Leave a Comment