पुणे | पुणे विद्यापीठात सलग 18 तास अभ्यास अभियान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाला मोठा वारसा असून, येथून खूप मोठी माणसं घडलेली आहेत, अशा या वास्तूत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सलग 18 तास अभ्यास करण्याचा राबविलेला उपक्रमात स्तुत्य आहे.

मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ एक दिवस नाही, तर वर्षभर यात सातत्य ठेवावे, तसेच आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती व लेखन संस्कृती खूप महत्त्वाची असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक वैचारिक साक्षरता निर्माण व्हावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले. याप्रसंगी कुलगुरूंनी स्वत: काही तास ग्रंथालयात बसून विद्यार्थ्यांसोबत अभ्यास केला.

या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सदानंद भोसले, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव, अधिसभा सदस्य राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे, कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील धिवार, मोहन कांबळे, डाप्साचे अध्यक्ष अमोल सरोदे आदी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, आताचे युग हे डिजिटल युग आहे. बऱ्याचदा मोबाइलमुळे आपले लक्ष विचलित होते. त्यामुळे एक सलग 18 तास अभ्यास करत असताना किती तास मोबाइल बंद ठेवतो, यालाही महत्त्व आहे. आपल्याला काही उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल, तर काही एक प्रेरणा घेऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. गेल्या 15 वर्षांपासून 18 तास अभ्यास अभियान राबावले जात असल्याचे डॉ. विजय खरे यांनी या वेळी नमूद केले.