nagar | मतदान प्रक्रियेसाठी १८ हजार ६७० कर्मचारी

नगर,(प्रतिनिधी) – नगर आणि शिर्डी या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी दि. १३ मे रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ३ हजार ७३४ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १८ हजार ६७० कर्मचारी लागणार आहेत. या कर्मचाऱ्यांना येत्या रविवारी (दि..७) प्रशिक्षण दिले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदार संघासाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अधिकारी आणि कर्मचारी लागणार आहेत. जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, महसूल सहायक, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम आदी विभागातील अधिकारी-कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केले जाणार आहेत. आरोग्य, अग्निशामक दल तसेच अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.

एका मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलीस अंमलदार अशा पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती राहणार आहे. त्याशिवाय १० टक्के कर्मचारी राखीव ठेवावे लागणार आहेत. जिल्ह्यातील एकूण ३ हजार ७३४ मतदान केंद्र असून १८ हजार ६७० कर्मचारी नियुक्त राहणार आहेत.

दिव्यांग व ८५ वर्षांपुढील वयाच्या मतदारांना घरातून मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार आहे. जिल्ह्यात १८ हजार ५२४ दिव्यांग, तर ८५ पेक्षा अधिक वयाचे सुमारे ६० हजार मतदार आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील अधिकारी- कर्मचारी मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर हजर असतील त्यांनाही टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध आहे. सुमारे ८० हजार मतदारांचे घरून मतदानाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. वयोवृद्ध आणि दिव्यांगांना घरून मतदानाची सुविधा प्रथमच दिली जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. दोन तासांचे हे प्रशिक्षण राहणार आहे.