nagar | जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १८८ तक्रारी दाखल

नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदार संघात आचार संहिता भंगाच्या १८८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून १० कार्यवाहिच्या प्रक्रियेत आहेत.

निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन होत असल्यास तक्रार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. मोबाईलवर सी-व्हिजिल ॲप डाऊनलोड करून त्यामाध्यमातून तक्रार आणि फोटो पाठविण्याची व्यवस्था आहे. त्याच बरोबर नाव गोपनीय ठेवण्याचा ही पर्याय आहे. ई-मेल, फोन आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन ही तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

नागरिकांची सर्वाधिक पसंती मोबाईलवरून सी-व्हिजिल ॲप डाऊनलोड करून त्यामाध्यमातून तक्रार करण्यास आहे. अहमदनगर मतदार संघात ६६ तक्रारी, शिर्डी मतदार संघात ३२ तर जिल्हास्तरावर ३३ अशा एकून १३१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ॲपवरील तक्रारी विधानसभा मतदार संघनिहाय नियुक्त केलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठविल्या जातात. तक्रार ज्या भागातील आहे, त्या विभागासाठी कार्यरत असलेल्या भरारी पथकाला ही तक्रार पाठविली जाते. भरारी पथक घटनास्थळी जाऊन तक्रारीची खात्री करतात.

तक्रारीत तथ्य असल्यास त्याबाबत कार्यवाही कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाच्या विभागकडे येते. त्या विभागाला कार्यवाही करण्यासाठी सूचित केले जाते. ग्रामपंचायत हद्दीतील कार्यवाही असल्यास ग्रामपंचायतीचे पथक त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही करते. या ॲपवरील तक्रारीचे शंभर तासांमध्ये निरसन केले जात आहे.

ई-मेल, फोन आणि प्रत्यक्षातील ५७ तक्रारी प्राप्त आहेत. अहमदनगर मतदार संघातील ४६ तर शिर्डीतील ११ तक्रारींचा समावेश आहे. अशा ५७ तक्रारी प्राप्त झाल्या असून ४७ तक्रारीचे निवारण करण्यात आले. दहा तक्रारी कार्यवाहीच्या प्रक्रियेत आहेत.