शिष्यवृत्ती परीक्षेचा 20.59 टक्‍के निकाल

एकूण निकालात 2.11 टक्‍क्‍याने वाढ


पाचवीचा निकाल 0.93 टक्‍क्‍याने घटला


आठवीचा निकाल 5.92 टक्‍क्‍याने वाढला

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा एकूण निकाल 20.59 टक्‍के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 2.11 टक्‍क्‍याने निकालात वाढ झाली आहे. इयत्ता पाचवीच्या परीक्षेचा निकाल 0.93 टक्‍क्‍याने घटला असला तरी इयत्ता आठवीच्या निकालात 5.92 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांत 24 फेब्रुवारीला इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतरिम निकाल गुरुवारी (दि.16) परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आला. शाळा व विद्यार्थ्यांना हा निकाल संकेतस्थळावर पाहण्यासाठी व प्रिंट काढून घेण्यासाठी उपलब्ध आहे.

यंदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 8 लाख 66 हजार 131 विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी झाली होती. यातील 8 लाख 37 हजार 540 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित तर 28 हजार 591 विद्यार्थी अनुपस्थित होते. 1 लाख 72 हजार 461 विद्यार्थी उत्तीर्ण तर 6 लाख 65 हजार 79 विद्यार्थी नापास झाले आहेत. एकूण निकाल 20.59 टक्‍के लागला आहे. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण 8 लाख 59 हजार 129 विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले होते. यात 8 लाख 31 हजार 493 विद्यार्थी उपस्थित तर 27 हजार 636 अनुपस्थित राहिले होते. यात 1 लाख 53 हजार 663 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 6 लाख 77 हजार 830 नापास झाले होते. या परीक्षाचा एकूण निकाल 18.48 टक्‍के लागला होता. यावरून एकूण निकालाचा विचार करता यंदा निकाल 2.11 टक्‍क्‍याने वाढला आहे, हे स्पष्ट होते.

यंदा इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5 लाख 12 हजार 763 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदविले होते. यातील 4 लाख 95 हजार 548 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित तर 17 हजार 215 अनुपस्थित होते. 1 लाख 9 हजार 226 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून 3 लाख 86 हजार 322 नापास झाले आहेत. या परीक्षेचा निकाल 22.04 टक्‍के एवढा लागला आहे. गेल्या वर्षात पाचवीच्या परीक्षेला 4 लाख 88 हजार 886 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील 4 लाख 72 हजार 645 विद्यार्थी उपस्थित तर 16 हजार 241 अनुपस्थित राहिले होते. यात 1 लाख 8 हजार 560 विद्यार्थी उत्तीर्ण तर 3 लाख 64 हजार 85 नापास झाले आहेत. याचा निकाल 22.97 टक्‍के लागला होता. दोन्ही वर्षांतील परीक्षेच्या निकालाची तुलना करता यंदाच्या पाचवीच्या निकालात 0.93 टक्‍क्‍याने घट झाली आहे.

यंदा इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 3 लाख 53 हजार 368 विद्यार्थ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली होती. यात 3 लाख 41 हजार 992 विद्यार्थी उपस्थित तर 11 हजार 376 अनुपस्थित राहिले आहेत. 63 हजार 235 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण तर 2 लाख 78 हजार 757 नापास झाले आहेत. या परीक्षेचा निकाल 18.49 टक्‍के लागला आहे. गेल्या वर्षी आठवीच्या परीक्षेला 3 लाख 70 हजार 243 विद्यार्थ्यांनी अर्जाची नोंदणी केली होती. यातील 3 लाख 58 हजार 848 विद्यार्थी उपस्थित व 11 हजार 395 विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते. यात 45 हजार 103 विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले असून 3 लाख 13 हजार 745 विद्यार्थी नापास झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आठवीच्या परीक्षेचा निकाल 5.92 टक्‍क्‍याने वाढला आहे.

अंतिम निकाल 15 जूनपर्यंत लागणार
शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकाल मुदतीतच लावण्यात आला आहे. या निकालाची गुणपडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या 27 मेपर्यंत शाळांच्या लॉगिनमधून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दाखल झालेल्या अर्जांची तपासणी करून परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी 15 जूनपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख स्मिता गौड यांनी दिली.

पाचवीचा निकाल घटला
सन 2016 पर्यंत इयत्ता चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत होती. यानंतर मात्र पाचवी व आठवीसाठी परीक्षा घेण्यात येऊ लागल्या आहेत. पूर्वीचे चौथीचे वर्ग जिल्हा परिषदांच्या शाळांना जोडलेले आहेत. त्यावेळी जिल्हा परिषद शाळांकडून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्यासाठी व निकालाची टक्‍केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे पहायला मिळत होते. त्यानंतरचे पाचवीचे वर्ग माध्यमिक शाळेला जोडले जातात. त्यामुळे आता शाळांकडून टक्‍केवारी वाढविण्यासाठी फारसे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नाही. यामुळे पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची टक्‍केवारी घसरली असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्‍त करण्यात आले आहे.

Leave a Comment