अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

वडूज – खटाव तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे (रा. दरूज, ता. खटाव) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 51 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली होती. तसेच या प्रकाराबाबत घरात व बाहेर कोणास काही न सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने तिला व तिच्या आईवडीलांना दिली होती.

त्यानंतर दिनकर पाटोळेवर पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे व सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक पी. एन. इंगळे व अधिकारी माधुरी सचिन जाधव यांनी गुन्ह्याचा तपास केला. त्यांनी पाटोळेला अटक करून गुन्ह्यातील वाहन जप्त केले. महत्त्वाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविले.

वैद्यकीय पुरावा गोळा करून व बारकाईने तपास करून आरोपीविरुध्द वडूजच्या जिल्हा न्यायालयात दोषारोप दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने सहायक जिल्हा सरकारी वकील अजित पी. कदम (साबळे) यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने 15 साक्षीदार तपासण्यात आले. कागदोपत्री पुरावा व सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी आरोपी दिनकर उर्फ दिनेश रघुनाथ पाटोळे याला 20 वर्षे शिक्षा व 50 हजार रुपयो दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच भा. द. वि. स. कलम 306 प्रमाणे 1000 रुपये दंड व दंडाच्या रकमेपैकी पिडीतेस 30 हजार रुपये रक्कम नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. याकामी सरकारी वकीलांना प्रॉसिक्‍युशन स्क्वॉड पुसेगावचे सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार विजयालक्ष्मी दडस, पो.कॉ. अक्षय शिंदे, पो. कॉ. सागर सजगणे, अक्षिनी घाडगे यांनी सहकार्य केले.