2022 वर्षात शोधले गेले 200 नवे ग्रह; अनेक गृहांवर पाणी असल्याचा अंदाज

न्यूयॉर्क – गेल्या वर्षभरात आपल्या सूर्यमालेबाहेरील सुमारे 200 नव्या ग्रहांचा शोध लावला गेला आहे. आतापर्यंत खगोलशास्त्रज्ञांनी अंदाजे 5 हजार ग्रह-ताऱ्यांचा शोध लावला आहे. त्यांची एकूण संख्या गेलया वर्षाच्या अखेरीपर्यंत 5,235 इतकी झाली आहे.

यातील बहुसंख्य ग्रह ताऱ्यांचा शोध अलिकडेच कार्यानिवित करण्यात आलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या माध्यमातून लावण्यात आला आहे. हबल टेलिस्कोपच्या जागेवर ही अतिताकदवान खगोल निरीक्षण दुर्बिण अवकाशात सोडण्यात आली आहे. जुलै महिन्यात या अवकाश निरीक्षक दुर्बिणीने आपले काम करण्यास प्रारंभ केला. तेंव्हापासून ही दुर्बिण अव्याहतपणे काम करते आहे.

10 अब्ज डॉलर खर्च झालेल्या या दुर्बिणीचे मुख्य काम म्हणजे ग्रहांचे जीवनचक्र अभ्यासणे हे आहे. तर आपल्या सूर्यमालेबाहेरील अन्य ग्रहांचा शोध घेणे हे दुसरे काम आहे, असे नासाने म्हटले आहे. आतापर्यंत शोधण्यात आलेल्या 5,235 ग्रहताऱ्यांपैकी 4 टक्के पृथ्वी आणि मंगळासारखे ग्रह आहेत, असेही नासाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी सर्वात अलिकडे शोधण्यात आलेल्या ग्रहाला एचडी109838 डी असे नाव देण्यात आले आहे. मात्र हा ग्रह नेपच्युनसारखा ग्रह आहे. त्याच्या प्रवासाच्या गतीच्या आधारे खगोलशास्त्रज्ञांनी हा ग्रह असल्याचा शोध लावला आहे. अलिकडेच शोधण्यात आलेल्या दोन ग्रहांवर पाणी असल्याचा अंदाज आहे.

या ग्रहांवरील पाणी प्रत्यक्ष दिसलेले नाही. मात्र त्यांचा आकार आणि त्यांच्या पृष्ठभागाच्या निरीक्षणाच्या आधारे या ग्रहांवर पाणी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ग्रहांचा पृष्ठभाग खडकापेक्षा अधिक चमकदार आहे. मात्र तेथील खडक हेलियम किंवा हायड्रोजनपेक्षा अधिक अवजड असल्याचेही निरीक्षण आहे.