Afghanistan News : अफगाणिस्तानातील पुरात २०० जणांचा मृत्यू

इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात अनेक जण जखमी देखील झाले आहेत. तालिबानच्या अधिकाऱ्याने ही माहीती दिली. मात्र जीवितहानीची नेमकी आकडेवारी या अधिकाऱ्याने दिलेली नाही.

अतिवृष्टीमुळे देशाच्या उत्तर भागामध्ये मोठा पूर आला आहे. बागलान प्रांतात महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रांतात किमान ५० जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे आणि अनेक जिल्ह्यांमधील मालमत्तांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

शेजारील ताखर जिल्ह्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे, असे तालिबान सरकारचा मुख्य प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बदख्शान, बागलान, घोर आणि हेरात या प्रांतांना सर्वाधिक फटका बसल्याचे मुजाहिदने म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण देशभरात मोठे आर्थिक नुकसान झाल्याचेही त्याने म्हटले आहे.

लोकांना पूरस्थितीपासून वाचवण्ययासाठी, सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि जखमींना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुरात वाहून गेलेल्यांचे मृतदेह बाहेर काढून दफन करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

बागलान प्रांतात पुरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी हवाई दलाला आदेश दिले गेले आहेत. आतापर्यंत शेकडो जणांना वाचवण्यात आले असून जखमींना लष्करी रुग्णालयांमध्ये दाखल केले गेल्याचे तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

एप्रिल महिन्यात देखील अफगाणिस्तानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे किमान ७० जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे २ हजार घरे, तीन मशिदी आणि चार शाळांचेही नुकसान झाल होते.