2000 वर्षापूर्वींची ममी अद्यापही सुस्थितीत; समोर आलेल्या माहितीनंतर शास्त्रज्ञही झाले हैराण

बीजिंग – इजिप्तमधील पिरॅमिड्स आणि त्या परिसरात आढळणाऱ्या ममी ही काय आता नवी गोष्ट राहिलेली नाही, पण चीनमधील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या एका ममीची अवस्था अद्यापही चांगली आहे. विशेष म्हणजे या ममीचे अंतर्गत अवयवसुद्धा काही प्रमाणात कार्यरत असल्याचे पाहून शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत.

1971 मध्ये संशोधकांना ही ममी सापडली होती या ममीचे वर्णन लेडी ऑफ डाय किंवा झिन झुई असे केले जाते ख्रिस्तपूर्व 178 ते 125 या कालावधीमध्ये ही महिला हयात होती. तिच्या मृत्यूनंतर तिचे ममीफिकेशन करण्यात आले.  संशोधकांना ही ममी सापडली तेव्हा ती अत्यंत सुस्थितीत होती शरीराची त्वचा आणि भुवया चांगल्या अवस्थेत होत्या. एवढेच नव्हे तर या ममीच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही प्रमाणात रक्ताचा अंशही संशोधकांना आढळला. ममीचे अंतर्गत अवयवही सुस्थितीत होते ममीसोबत संशोधकांना ज्या वस्तू सापडल्या होत्या.

त्या अत्यंत महाग आणि उंची प्रकारच्या असल्याने ही महिला उच्च घराण्यातील आणि श्रीमंत असावी असा संशोधकांचा अंदाज होता. त्या काळातील प्रथेप्रमाणे श्रीमंत आणि उच्च घराण्यातील लोकांचे ममीफिकेशन करत असताना एक वेगळी प्रक्रिया राबवली जात असे त्याचा परिणाम म्हणून 2000 वर्षानंतर सुद्धा ममी सुस्थितीत होती. डॉक्टर्सनी या ममीची जेव्हा वैद्यकीय तपासणी केली तेव्हा या ममीच्या पोटामध्ये त्यांना कलिंगडाच्या शंभर बिया सापडल्या. मृत्यूपूर्वी या महिलेने कलिंगड खाल्ले असावे असा तर्क संशोधकानी केला होता.

ममीला ज्या कापडात गुंडाळण्यात आले होते. त्याचे एकूण 18 स्तर होते आणि ते कापड अत्यंत उच्च दर्जाचे होते. एवढेच नव्हे तर ज्या शवपेटीकेत ही ममी सापडली होती त्या शवपेटीकेमध्ये जो द्रव पदार्थ वापरण्यात आला होता तो सुद्धा वेगळ्या प्रकारचा होता असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्या काळात सापडणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर करून हे ममीफिकेशन करण्यात आले होते. त्यामुळे हा मृतदेह दीर्घकाळ सुस्थितीत राहिला, असेही शास्त्रज्ञांना वाटत आहे. या ममीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मृत्यूपूर्वी ही महिला खूप आजारी होती आणि मृत्यू वेळी तिचे वय सुमारे 50 असावे, असा अंदाज शास्त्रज्ञांनी केला आहे.