315 पैकी 21 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून रविवारी रात्रीपर्यंत करोनाचे 16 रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्ण हा पिंपरी-चिंचवड परिसरातील असून तो जपानला जाऊन आला होता. यापूर्वी दाखल असलेल्या 16 व्यक्तींना घरी सोडले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये (एनआयव्ही) 315 व्यक्तींचे तपासणीचे नमुने पाठवले होते. त्यापैकी 294 अहवाल प्राप्त झाले असून 21 व्यक्तींचे अहवाल येणे बाकी असल्याचे आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, परदेशातून आलेल्या 430 व्यक्तींचा पाठपुरावा सुरू आहे. यात 104 हे नवीन प्रवासी आहेत. करोनाची बाधा असलेल्या सात देशांतून त्यांनी प्रवास केलेला नाही. यातील 3 व्यक्तींनी स्वत:हून आजारी असल्याचे सांगितल्याने त्यांना नायडू रुग्णालयात पाठवले आहे. करोनाचे नवीन पाच रुग्ण सापडले आहेत. त्यांनी परदेशी प्रवास केलेला नाही. थायलंड येथे केलेल्या प्रवाशाच्या घरातील या चार व्यक्ती आहेत. थायलंड येथे गेलेला हा प्रवासी 93 जणांच्या ग्रुपबरोबर सहलीसाठी गेलेला होता. त्या सर्व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यात येत आहे. या व्यक्तींनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

चुकीची माहिती पसरवणाऱ्यावर गुन्हा
खुद्द विभागीय आयुक्तांना व्हॉट्‌स ऍपवर “एका ठिकाणी करोनाचे 25 रुग्ण आढळले आहेत,’ असे एका व्यक्तीने सांगितले. यावर त्यांनी संबंधित व्यक्तीला नाव, ठिकाण असे विचारले असता त्याने फोन बंद केला. अशी चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्या व्यक्तींचा शोध घेत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

रुग्णांच्या माहितीसाठी ऍप विकसित
करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मोबाइल ऍप विकसित केले आहे. यामध्ये घरी थांबण्याच्या सूचना दिलेल्या व्यक्तींच्या तब्येतीची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर डॉक्‍टरसुद्धा या ऍपमध्ये रुग्णाची माहिती भरणार आहे. त्यामुळे करोनाच्या संशयित रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. या ऍपमध्ये डॉक्‍टर, नागरिक, दोन्ही ही लॉग-इन करू शकणार आहे.

लॉग-इन केल्यावर संबधित व्यक्तीला युजर नेम आणि पासवर्ड मिळणार आहे. ज्या व्यक्तीला घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या व्यक्ती या ऍपचा वापर करत आहे. संबधित व्यक्तीचे जिओ टॅंगिंग करण्यात येत आहे. दर 12 तासांनी संबंधित व्यक्ती आपल्या प्रकृतीची माहिती यामध्ये “अपडेट’ करत आहे. माहिती “अपडेट’ करण्याची आठवण संबधित व्यक्तीला एसएमएसच्या माध्यमातून देण्याची सोय केली असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Leave a Comment