गड्या… एसटी कोकण चललंय ! पुण्यातून 250 गाड्या; बुकिंगला प्रतिसाद

 

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 25 -गौरी-गणपती म्हटलं, की पुण्या-मुंबईतील कोकणवासीयांची पावले गावाकडे वळतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सणासाठी गावी जाण्याची कोकणी कुटुंबीयांनी तयारी केली असून, त्यांच्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल 250 गाड्यांची व्यवस्था केली आहे. यातील 120 गाड्यांचे बुकिंग आताच फुल्ल झाले आहे. याशिवाय महामंडळाने इतरही जिल्ह्यांत गणेशोत्स्वासाठी 150 जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे.|

गणेशोत्सव आणि कोकण यांचे एक समीकरण आहे. कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो; पण, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजन पडले होते. नोकरीसाठी पुण्यात आलेल्या कोकणवासियांना पुण्यातच दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करावा लागला. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने चाकारमान्यांनी आपल्या गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून, या पार्श्‍वभूमीवर कोकणवासियांसाठी 250 विशेष बसची व्यवस्था पुणे एसटी विभागातर्फे करण्यात आली आहे.

कोकणात जाण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठी 170 बसची व्यवस्था करण्यात आली असून, त्यातील 120 बसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. यांसह 30 बस ग्रुप बुकिंगद्वारे बुक करण्यात आल्या आहेत. बुकिंग न करता जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी 27 ऑगस्टपासून 50 स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर या शहरात जाण्यासाठी 150 स्वतंत्र बसची व्यवस्था पुणे एसटी विभागाकडून करण्यात आली आहे.

कोकणात दरवर्षी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जातात. दोन वर्ष कोरोनामुळे नागरिकांना कोकणात जाता आले नव्हते. पण यावर्षी शासनाने निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग केले आहे. एसटीचे अजूनही बुकिंग सुरू असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
– ज्ञानेश्‍वर रनावरे, विभागीय वाहतूक व्यवस्थापक, एसटी