वाई, खंडाळा, महाबळेश्‍वरच्या रस्त्यांसाठी 35 कोटींचा निधी

वाई  – मतदारसंघातील वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्ते दळणवळणासाठी सोयीस्कर व्हावेत यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून विविध रस्त्यांच्या कामासाठी व पूल बांधकामांसाठी 34 कोटी 91 लाखाचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.

आमदार मकरंद पाटील यांनी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्प बजेटमधून पाठपुरावा करून सुमारे 34 कोटी 91 लाख कोटींचा निधी मंजूर करुन घेतला आहे. या योजनेतून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि रस्त्यांवरील पुलांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. वास्तविक राज्यातील सर्वाधिक मोठा मतदारसंघ असल्याने येथे दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करणे मोठे जिकरीचे आहे. त्यातच यामध्ये अधिकचा भाग हा डोंगराळ व अती पावसाचा असल्याने कित्येकदा भुस्खलन होऊन रस्त्यांची पडझड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे वारंवार रस्ते नव्याने तयार करावे लागतात. तरीही आमदार मकरंद पाटील हे दळवळणाच्या सुविधेकडे कटाक्षाने लक्ष देत असतात.

मंजूर कामांमध्ये वाई शहरातील किसनवीर कॉलेज ते वाई स्टॅन्ड ते भिमनगर खराब रस्ता, जोशीविहीर ते शिरगाव खराब रस्त्यासाठी पाच कोटी रुपये, शहाबाग फाटा ते सुरुर मधील खराब रस्त्यासाठी दोन कोटी, भुईज कारखाना ते राऊतवाडी खराब रस्त्यासाठी तीन कोटी रुपये, वाईच्या पश्‍चिम भागातील गोवे- भिवडी खराब रस्त्यासाठी एक कोटी 50 लाख रुपये खंडाळा तालुक्‍यात कान्हवडी ते अतिट रस्त्यासाठी एक कोटी 90 लाख, नायगांव ते लोहम फाटा या खराब रस्त्यासाठी पाच कोटी, प्र.रा.मा.15 ते पिंपरे या खराब रस्त्यासाठी चार कोटी रुपये, अंदोरी ते वाघोशी खराब रस्त्यासाठी दोन कोटी रुपये,

महाबळेश्‍वर तालुक्‍यात कोयना नदीवरील हातलोट गावाला जाणाऱ्या रस्त्यावर पुल बांधण्यासाठी चार कोटी 96 लाख, चतुरबेट ते अहिर दरम्यान रस्त्यावर चार लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी 60 लाख रुपये, गाढवली ते उत्तेश्‍वर मंदीर दरम्यान दोन लहान पुलांचे बांधकाम करण्यासाठी 98 लाख, 48 हजार रुपये तर घावरी ते येर्णे रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी 96 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.