पुणे जिल्हा | माळेगावात ४०० माजी विद्यार्थी सहभागी

माळेगाव, (वार्ताहर)- माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १९९४ ते २०२३ या कालावधीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व माजी अभियंता विद्यार्थ्यांचा मेळावा प्रत्यक्ष उपस्थिती व ऑनलाईन युट्युब लाईव्ह माध्यमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. मेळाव्यासाठी ४०० माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १५००० विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

मोठा कालखंड लोटला तरी प्रत्येकजण आपापल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र ते अशक्य नसते हे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याने दाखवून दिले आहे. मेळाव्याद्वारे तब्बल ३४ वर्षातील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यात महाविद्यालयाला यश आले. विविध देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होणे शक्य झाले.

कार्यक्रम विविध चर्चासत्राने रंगला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत केलेल्या चर्चा व हास्यकल्लोळामुळे या मेळाव्यात रंगत भरली. माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयक विचारांची देवान-घेवाण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या संधी व मार्गदर्शन असा उद्देश या मेळाव्याच्या असल्याचे संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी संदेशात म्हटले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव जगताप यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी महाविद्यालयातील घडामोडींवर माहिती सादर केली. मेळाव्यामध्ये ॲल्युमिनी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. असोसिएशनद्वारे भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दलची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. हेमंत सुपेकर यांनी दिली.

संयोजक व ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राउळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चार वर्षात एकूण १५०० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. ही प्रक्रिया अजूनही चालू आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व माळेगाव कारखान्यांचे अध्यक्ष केशवराव जगताप, संचालक मंडळ, विश्वस्त रवींद्र थोरात, वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, निमंत्रित सदस्या सीमा जाधव, चैत्राली गावडे, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.