पालिकेच्या 45 टक्के कर्मचाऱ्यांना होऊन गेला करोना

 

पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील तब्बल 45 टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊन गेली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये करोनाला प्रतिकार करणाऱ्या ऍन्टिबॉडीज आढळून आल्या आहेत. करोना नियंत्रणाच्या कामात अत्यावश्‍यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा कशा प्रकारे होते. याचा अभ्यास करण्यासाठी एनआयव्ही ( राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था) कडून मागील आठवडयात महापालिकेत सिरो सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेच्या अहवालातून ही बाब समोर आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, गेल्या आठ महिन्यात महापालिकेच्या सुमारे 638 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झालेली असून त्यात, 38 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

एनआयव्ही कडून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 45 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये ऍन्टीबॉडीज तयार झाल्या झालेल्या आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे, त्यांना करोना झाल्याचेही समजले नसल्याचे यात समोर आले आहे. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेचे सुमारे 17 हजार कर्मचारी अविरतपणे करोना नियंत्रणाच्या कामात असून गेल्या महिनाभरात रूग्णसंख्या घटल्याने या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment