Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी चौथ्यांदा धमकीचा मेल; सुरक्षेत वाढ

Mukesh ambani : सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमकीचे मेल येत आहे. यातच आता त्यांना चौथ्यांदा धमकीचा मेल मिळाला आहे. यावेळी त्यांच्याकडे 400 रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.

यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी मेलद्वारे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा 200 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा देण्यात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तर चौथ्यांदा देखील 400 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करत आहे. तसेच हा मेल बेल्जियम या देशातून येत असल्याचे समोर आले आहे. ईमेल पाठविणाऱ्याचा आयपी एड्रेस शोधल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

बेल्जियममधील त्या मेल प्रोव्हाईडर कंपनीशी पोलिसांनी संपर्क साधल्याचे समोर येत आहे. मेल पाठवणाऱ्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. धमकीच्या या सत्रानंतर अंबानी कुटूंबाच्या घराची सुरक्षा देखील वाढण्यात आली आहे. तसेच मुकेश अंबानी यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या आलिशान घराजवळ ही कार सापडली होती. त्यात 20 जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र सापडले होते.