15 जून पर्यंत 5 कोटी 85 लाख डोस उपलब्ध करून देणार

नवी दिल्ली – लसींच्या उपलब्धतेबाबत राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना आगाऊ माहिती देऊन त्यांना नियोजनासाठी अवधी देण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार त्यांनी देशात येत्या 15 जून पर्यंत 5 कोटी 85 लाख लसींचे डोस मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

या लसींचे डोस कोणत्या राज्यांना किती प्रमाणात दिले जाणार आहेत याचीही माहिती लवकरच दिली जाणार आहे.

केंद्र सरकार 50 टक्के लस पुरवणार असून राज्य सरकारांनी 50 टक्‍के लस स्वत: विकत घेऊन त्याचे वितरण करायचे आहे असे धोरण केंद्र सरकारने निश्‍चीत केले आहे. केंद्र सरकारतर्फे ही जी लस येत्या महिनाभरात पुरवली जाणार आहे ती त्यांच्या 50 टक्के कोट्यातील आहे. 

लस उत्पादक कंपन्याकडून मिळालेल्या माहिती नुसार जून महिन्याच्या अखेर पर्यंत अजून अतिरीक्त 4 कोटी 87 लाख डोस उपलब्ध होणार आहेत. या लसींच्या वितरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना काही मार्गदर्शक तत्वेही लागू केली आहेत. 

त्यात लसींच्या वितरणाचे वेळापत्रक निश्‍चीत करा, लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्या वगैरे सूचना करण्यात आल्या आहेत. लसींच्या अभावी देशाच्या बऱ्याच भागातील 18 ते 45 वयोगटातील नागरीकांचे लसीकरण सध्या बंद आहे. काही ठिकाणी तर पूर्णच लसीकरण बंद आहे.