सातारा । राज्यात आले पाच लाख कोटींचे उद्योग

मेढा – महाराष्ट्रातील उद्योग बाहेर पळाले म्हणणारांच्या काळात राज्यात काय झाले हे वेगळे सांगायची गरज नाही. पण आमचे सरकार विकासाभिमुख असून राज्यात पाच लाख कोटींचे उद्योग आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुनावळे येथील आतंरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. श्रद्धा शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, संजय बैलकर, राजू भोसले, ज्ञानदेव रांजणे, जयदीप शिंदे, सागर धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुनावळे येथील हा जलपर्यटन प्रकल्प देशातील एक नंबरचा असून कोयना विभागातील पर्यटन वाढ, स्थानिकांना रोजगार ही उद्दिष्टे साध्य होणार आहेत. कोयनेचे नव्वद किलोमीटरचे बॅकवॉटर असले तरी कायदेशीर अडचणींमुळे काही करता येत नव्हते. ऑफिसिएल सिक्रेट ॲक्ट कायदा काढल्याने या परिसरात आता विकासकामे करता येणार आहेत. मी या मातीतील असून माझा जन्म इथला आहे. येथील जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळत आहे याचा अभिमान आहे. पंचवीस एकरात होणारा हा प्रकल्प पूर्ण प्रदूषणविरहित असून स्थानिकाना सौर बोट घेण्यासाठी बिनव्याजी कर्जे दिली जातील. पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडणारा रस्ता आपण करत असून दोन मोठे पूलही उभे राहत आहेत. स्थानिक युवकांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि बाहेर गेलेले युवक पुन्हा भागात आले पाहिजेत असा आमचा दृष्टिकोन आहे.

मुख्यमंत्र्यांचे पहिले तिकीट…
मुनावळे येथील या जलपर्यटन प्रकल्पात एमटीडीसीमार्फत विविध आकर्षक बोटी दाखल झाल्या असून तिकीट विक्री केंद्रही सुरू झाले आहे. या तिकीट विक्री केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिले तिकीट विकत घेऊन शुभारंभ केला. त्यानंतर उद्योगमंत्री, पालकमंत्री, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांनीही तिकीट खरेदी केले.

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार स्थानिकांना प्राधान्य देणार – शिंदे
कोयनेच्या शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे. एमटीडीसीद्वारे सुरु होत असलेला देशातील असा एकमेव प्रकल्प असून यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या जलपर्यटन केंद्रावर स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.