‘५० टक्के ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणीसाठी जात नाहीत’; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली – देशाच्या शहरी भागांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की किमान ५० टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणी आणि प्रवासाच्या अडचणीमुळे आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. ग्रामीण भागातील अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या तर ६२ टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून हे आकडे समोर आले आहेत.

एजवेल या स्वयंसेवी संस्थेकडून हे सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेत १० हजार नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षणातून त्यांना ज्या प्रतिक्रिया मिळाल्या त्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्या आजारांसाठी नियमित आरोग्य तपासणीची गरज असते असे आजार झाल्यावरही रूग्णालयात जाणे त्रासदायक ठरत असल्यामुळे लोकांनी उपचारच थांबवल्याची माहिती काही ज्येष्ठांनी दिली.

एका ७२ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठांने सांगितले की उपाचारांसाठी येणारा अत्याधिक खर्च हाच मोठा अडथळा आहे. तेवढी ऐपत नसल्यामुळे उपचार घेणे परवडत नाही आणि शेवटी ते थांबवावे लागते. जर आरोग्य विमा घेतला असता तर कदाचित स्वत:वर चांगले उपचार करू शकलो असतो.

स्वयंसेवी संस्थेने आपल्या सर्वेक्षणांती असे म्हटले आहे की आर्थिक परिस्थिती आणि वाहतूक सुविधा (येण्या जाण्याचा त्रास) आदींमुळे शहरी भागांत तब्बल ४८. ८ टक्के ज्येष्ठ नियमितपणे डॉक्टरांकडे आरोग्य तपासणीसाठी जाण्याचे टाळतात आणि ग्रामीण भागातील असे उपचार टाळणारे किंवा थांबवणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण ६२. ४ टक्के आहे. अगदीच आवश्‍यकता भासलीच तर रूग्णालयात जातो असे या लोकांनी म्हटले आहे.

सर्वेक्षणात आणखी एक बाब आढळून आली आहे. ज्या १० हजार ज्येष्ठांशी एनजीओने संपर्क साधला त्यातील २४ टक्के नागरिकांना एकाकीपणाचा सामना करावा लागतो आहे. हे एकाकीपणा आरोग्य विषयक चिंता वाढवण्याचेच काम करते. या संदर्भात समाजस्तरावर आधारित पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.