पुणे जिल्हा | मुळशी तालुक्यात 54.79 टक्के मतदान

पौड, (वार्ताहर) – मुळशी तालुक्यात शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. एकूण 54.79 टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली. तालुक्यात एकूण 226 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. माण, मांदेडे, आदरवाडी, भोईनी, शेडाणी, वळणे, दत्तवाडी,

नांदीवली येथील विविध केंद्रामधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने, त्यात लागलीच दुरुस्ती करून मतदान सुरळीत करण्यात आले. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने अनूचित प्रकार घडले नाहीत. एकंदरीत प्रशासनकडून उत्तम नियोजन व पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

मुळशीत काही गावांमध्ये 70 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याने गावकर्‍यांनी जोरदार उत्साह दाखवला. तर काही ठिकाणी निरुत्साह देखील पहायला मिळाला. काही मतदारांचे नाव दुसर्‍या गावात गेले, तर काहींची नावं दोन्ही गावात सुद्धा होती. काही मतदारांची नावं आपोआप दुसर्‍या गावात गेल्याने मतदारांना मतदान करता आले नाही.

कारण नाव दुसर्‍या यादीत गेले हे मतदारांना शेवटपर्यंत समजलेच नाही. दखणे येथे मात्र काजल दहीभाते या महिलेचे नाव कुळे गावात गेल्याचे शेवटच्या 10-15 मिनिटात समजल्याने त्यांनी त्वरित कुळे गावात जाऊन शेवटच्या तिसर्‍या मिनिटात मतदान केल्याचे मधुर दाभाडे यांनी सांगितले.

हिंजवडी आयटी परिसरात मतदान करणार्‍यांमध्ये मतदारांची संख्या यावेळी घटलेली पहायला मिळाली. आयटीतील नागरिक केवळ सकाळी आणि संध्याकाळी मतदानासाठी घराबाहेर पडले. तर उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी आयटी परिसरात मतदानाची टक्केवारी घसरलेली पहायला मिळाली.

भेळ, वडापाव, थंड पेयाची चंगळ
मतदान प्रक्रिया चालू असताना 100 मीटर परिघाबाहेर मतदार व राजकीय कार्यकर्त्यांकडून नाष्टा व थंड पेयाची ग्रामस्थांकडून सोय करण्यात आली होती. यामध्ये भेळ, वडापाव, बिर्याणी तसेच मठ्ठा, सरबत, ज्यूस पाकिटं अशी देखील सोय करण्यात आली होती. कोळवण येथे चिन्मय विभूती येथील सामाजिक संघटनेतर्फे मतदान केलेल्या नागरिकांना ज्युसची पाकिटं वाटली.

कासार आंबोली येथे चोख नियोजन –
मुळशीत मतदान झाल्यानंतर मतदान साहित्य व ईव्हीएम कासार आंबोली येथील सैनिकी शाळेत गोळा करण्यात आल्या येणार होत्या. मुळशी तहसील व पोलीस प्रशासनकडून त्याचे चोख नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वेगवेगळे काउंटर तयार केले होते, त्यामुळे साहित्य जमा करण्यात सुलभता येणार होती.

याठिकाणी तत्परतेसाठी एक रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली होती. येथे येणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी माले आरोग्य केंद्रार्फत करण्यात येत होती. जवळपास 200च्यावर कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी दोन दिवसात करण्यात आली. प्रथमोपचार, प्राथमिक आरोग्य किट तयार ठेवण्यात आले होते.