‘रयत’मध्ये निवड झालेले 645 शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत पवित्र पोर्टलद्वारे निवड

दीपक नामदे

कलेढोण : राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतून (टेट) शिक्षक उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषदांनी नियुक्त्या दिल्या. मात्र, उच्च गुण मिळवूनसुद्धा रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक नियुक्तीपासून वंचित आहेत. ‘पवित्र पोर्टल’साठी रयत शिक्षण संस्थेने 808 जागांची जाहिरात दिली होती. त्यातील 645 उमेदवारांची निवड झाली असली, तरी संस्थेतून या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी वा नियुक्तीसंदर्भात अद्याप सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

गतवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ‘टेट’ म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली. या परीक्षेचा निकाल मार्च मध्ये लागला. यावर्षी फेब्रुवारीमध्ये गुणवत्तायादी लागून तब्बल चार महिने उलटले आहेत. मात्र, निवड झालेल्या उमेदवारांना शासनाकडून अथवा संस्थेकडून कागदपत्रांची पडताळणी व नियुक्तीसाठी अधिकृत सूचना दिली गेली नसल्याने, हे उमेदवार नैराश्याच्या गर्तेत आहेत. संस्थेने नियुक्तीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी उमेदवार करत आहे.

वंचित शिक्षकांचे आयुक्तांना निवेदन
वंचित शिक्षकांनी 14 फेब्रुवारीच्या न्यूज बुलेटिन चा आधार घेऊन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेऊन, आपल्या नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन दिले; परंतु त्यांच्याकडूनही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने उमेदवार हताश झाले आहेत.

‘रयत’चे भावी शिक्षक नैराश्येत
चार महिन्यांची प्रतीक्षा करूनही ‘रयत’च्या भावी सेवकांना कोणतीही सूचना नसल्याने ते नैराश्यामध्ये आहेत. अनेक वर्षे शिक्षक भरती झाली नसल्याने हे शिक्षक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कार्यरत होते. ‘टेट’चा निकाल लागल्यानंतर अनेक शिक्षकांनी नोकर्‍या सोडल्या आहेत; परंतु नेमणुकीतील दिरंगाईमुळे त्यांच्यापुढे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड झाली असून, नियुक्ती प्रक्रियेतील विलंबामुळे भविष्यात पर्यायी नोकर्‍या कुठे करायच्या, मुलांचे प्रवेश कुठल्या शाळांमध्ये घ्यायचे, राहण्याची सोय आदी बरेच प्रश्न या उमेदवारांपुढे आहेत.