पिंपरी | ४५ गावांतील ६५ हजार ग्राहक उकाड्याने त्रस्त

पिंपरी,(प्रतिनिधी) – उन्हाची काहीली वाढली असून तापमानाचा पारा ४०च्या पुढे गेला आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले असतानाच महापारेषणच्या वाहिन्यांमध्ये विविध कारणांनी बिघाड होत असून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अधीच उकाड्याने त्रस्त झालेल्या ग्राहकांना महावितरण वीजपुरवठा खंडित करून झटके देत आहे.

महापारेषणची एक वाहिनी तुटल्याने भुकूम, भूगाव, पिरंगुट, कोळवण खोरे, मुठा खोरे आदी मुळशी परिसरातील ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही टॉवर लाइनची दोन पैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट २२० केव्ही व हिंजवडी २२० केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या २० वाहिन्यांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजता बंद पडला. परिणामी ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली.

कोकणातील रोहा येथून महापारेषणच्या कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, कांदळगाव २२० केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास तुटली.

त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे, कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड, माले, माण, मारूंजी, कासारसाई, नेरे, दत्तवाडी, हिंजवडीचा काही भागांसह ४५ गावांतील सुमारे ६५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणची अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने ७० मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली आहे.

सहा तासांनी वीजपुरवठा सुरळीत
सकाळी ९.१० वाजता खंडित झालेल्या वीजपुरवठ्याची युद्धपातळीवर पर्यायी व्यवस्था करून दुपारी १२.५ ते ३.३६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. सध्या तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढल्याने ७० मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करणे आव्हानात्मक होत आहे.

दरम्यान, महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला व दुपारी ३.२५ वाजता तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण झाले. त्यानंतर महापारेषणची कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. त्याद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचा वीजपुरवठा देखील पूर्ववत झाला.

अपत्तीपूर्व व्यवस्‍थापन गरजेचे
महावितरणकडून पावसाळ्यापूर्वीच देखभाल दुरुस्‍तीची कामे हाती घेतली जातात. दरवषी पावसाळ्यात भर उन्‍हाळ्यात खंडित वीजपुरवठ्याचा त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. महावितरण वीजबिल भरले नाही की विद्युतपुरवठा खंडित करते. परंतु तासंतास वीजपुरवठा खंडित झाल्याने लहान मोठे व्यावसायिक व नागरिकांचे जे नुकसान होत आहे याची भरपाइ कोण करणार असा प्रश्न नागरिक करत आहेत.