देशातील 67 टक्‍के विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्राधान्य

पुणे – गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी विद्यापीठांत शिक्षणासाठीचे प्रमाण वाढले आहे. विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा परदेशी शिक्षणाकडे राहिला असून याकरिता अमेरिकेला सर्वाधिक पसंती मिळाल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली.

अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधील गेल्या 12 महिन्यांतील प्रवाह जाणून घेण्यासाठी “प्रोडिजी फायनान्स’ या आघाडीच्या क्रॉस बॉर्डर फिनटेक प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वाधिक विद्यार्थी हे महाराष्ट्रातून जात आहे.

विदेशात मास्टर्स डिग्री करण्याकरिता प्रोडिजी फायनान्सद्वारे निधी पुरवलेल्या एकूण भारतीय विद्यार्थ्यांपैकी 67 टक्‍के विद्यार्थी अमेरिकेत गेले. त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी 8 टक्‍के विद्यार्थी गेले.

मागील वर्षात भारतातील ज्या राज्यांतून विद्यार्थी विदेशात शिकायला गेले त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त 20 टक्‍के विद्यार्थी आहे. त्यानंतर कर्नाटकातून 15 टक्‍के, दिल्ली येथून 12 टक्‍के आणि तेलंगणा येथील विद्यार्थ्यांचे प्रमाण 8 टक्‍के आहे.

विदेशात गेलेल्यांपैकी जवळपास 70 टक्‍के पुरुष, तर 30 टक्‍के महिला होत्या. मागील वर्षी देशव्यापी लॉकडाऊनमुळे बहुतांश कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागल्याने विदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्‍चितता होती. तरीही
2019 च्या तुलनेत 2020मध्ये यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये 41 टक्‍क्‍यांनी वाढले.