राज्यात 70 लाख टन साखर पडून  

– दोन वर्षे साखर पुरणार
– 22 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगामा सुरु

मुंबई : दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे ऊसाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. मात्र, त्यामुळे राज्यात साखरेचा तुडवटा निर्माण होणार असल्याची चिंता नाही. कारण राज्यात दोन वर्षे पुरेल इतकी 70 लाख मेट्रीक टन साखर शिल्लक आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, यंदाचा उस गाळप हंगाम येत्या 22 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
राज्यातील ऊस उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी मंगळवारी राजभवनावर बैठक घेतली. राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने मुख्यमंत्र्यांऐवजी यावेळी राज्यपालांनी बैठक बोलावली होती.

या बैठकीनंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दुष्काळ आणि राज्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे यंदा उसाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 50 टक्के इतके कमी झाले आहे. याचा फटका ऊस गाळपावर होणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उस गाळप जवळजवळ पन्नास टक्क्‌यांनी घटणार आहे. त्यामुळे यंदा फक्त यंदा केवळ 58 लाख 28 हजार मेट्रीक टन इतके उत्पादन होण्याची शक्‍यता आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

कमी ऊस उत्पादनाचा बाजारावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याला वर्षाला 35 लाख मेट्रिक टन साखरेची आवश्‍यकता भासते. पण राज्यात 70 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असून दोन वर्षे तुटवडा होणार नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
राज्यात सततचा कोरडा आणि ओला दुष्काळ यामुळे सर्व भागात उस पिकाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे. गेल्यावर्षी 11 लाख 62 हजार हेक्‍टर क्षेत्रांवर उस लागवड होऊन 952 लाख मेट्रीक टन उस गाळप झाले होते. त्यामुळे गेल्यावर्षी 107 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा हे प्रमाण घटून 8 लाख 22 हजार हेक्‍टर इतक्‍या क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा 518 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होणार असून केवळ 58 लाख 28 हजार मेट्रीक टन इतके उत्पादन होणे प्रस्तावित आहे.

छावण्यांमध्ये ऊसाचा चारा
राज्यात दुष्काळ पडल्यामुळे चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. सगळयात जास्त छावण्या मराठवाडयात होत्या. या छावण्यात लाखो जनावरांची सोय करण्यात आली होती. छावण्यातील जनावरांना चारा म्हणून उसाचे वाटप केले जात होते. यामुळे उसाचे गाळप कमी होणार आहे. उसाला एफआरपी 27500 रुपये इतका मिळत असताना चारा म्हणून शेतकछयाला 3000 हजार ते 3500 रुपये टनाला दर मिळत होता. मराठवाडयातील उस्मानाबाद जिल्हयातील तसेच सोलापूर जिल्हयातील सुमारे पन्नास टक्के साखर कारखान्यांना यंदा उस पन्नास टक्के इतका कमी मिळणार आहे. यामुळे गाळप देखील घटणार आहे.

Leave a Comment