महाराष्ट्रातील 70 टक्के करोनाबाधित 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे

मुंबई : देशातील सर्वांधिक करोनाबाधित असणाऱ्या महाराष्ट्राबाबत महत्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, राज्यातील 70 टक्के करोनाबाधित 21 ते 50 वर्षे वयोगटातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्यांपैकी 2 हजार 330 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 1 हजार 646 रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर 684 बाधितांनी वयाची पन्नाशी पार केली आहे. जगभरातील आकडेवारी पाहता वयाची पन्नाशी पार केलेल्यांना करोना संसर्गाचा अधिक धोका असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, महाराष्ट्रातील चित्र त्या माहितीला छेद देणारे ठरले आहे. राज्यातील 478 रुग्ण 21 ते 30 वर्षे वयोगटातील आहेत. 31 ते 40 वर्षे वयोगटातील 446 जणांना करोनाची लागण झाली. तर 41 ते 50 वर्षे दरम्यान वय असणारे 432 रुग्ण आढळले.

अर्थात, मृतांची संख्या ध्यानात घेता वयाची पन्नाशी ओलांडलेल्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातील 171 मृतांच्या वयोगटाची छाननी करण्यात आली. त्यानुसार, वयाची पन्नाशी पार केलेल्या आणि करोनामुळे दगावलेल्यांचे प्रमाण 77 टक्के इतके आहे. ती संख्या 132 आहे. करोनाबाधेमुळे मृत्युमुखी पडलेले 104 रूग्ण 51 ते 70 वर्षे वयोगटातील होते. मृतांपैकी 39 रुग्ण 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते.

Leave a Comment