nagar | आचारसंहितेत ७३ लाखांची रोकड जप्त

नगर,(प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ७३ लाख २४ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. १२ हजारांपेक्षा जास्त गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवडणुक निरीक्षक रविकुमार आरोरा, खर्च निरीक्षक शक्ती सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.

केंद्रिय निवडणूक आयोगाने लोकसभेची निवडणूक दि.१६ मार्च रोजी जाहीर केली. त्यावेळेपासून आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ५० हजारांपेक्षा जास्त रोख स्वरूपात रक्कम बाळगल्यास त्या रक्कमेचा तपशील आवश्‍यक असतो.

पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळेल्या माहितीनुसार संशयास्पद स्वरूपात ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम बळगणाऱ्यांना पकडण्यात आले. आतापर्यंत ७३ लाख २४ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. या रक्कमेबाबत सबळ पुरावा सादर केल्यावर आयकर विभाग रक्कम परत करते. त्यासाठी स्वतंत्र समिती कार्यरत आहे.

तसेच ९३ लाख ९७ हजार रूपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अंमली पदर्थात ९३ किलो २९३ ग्रॅम ( ६ लाख ७० हजार ६३ रूपये किंमत) जप्त करण्यात आले आहेत. १२ गावठी कट्टा आणि २० जीवंत काडतुसे, १६ तलवारी, ९ कोयते, २४ चाकू जप्त करण्यात आले आहेत. परवानाधारक २ हजार ४४२ शस्त्र जमा करण्यात आले आहेत.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर १२ हजार व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सीआरपीसी कलम १०७ अन्वये १० हजार १२४ व्यक्तींवर कारवाई केली आहे. कलम १०८ प्रमाणे ४४ व्यक्ती, कलम १०९ प्रमाणे २६, कलम ११० प्रमाणे १ हजार ८१४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ अन्वये ४३ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. एमपीएडी कायद्यानुसार एका व्यक्तीवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.