म्हाडाच्या घरांसाठी 75 हजार अर्ज; अनामत रक्‍कम भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

पुणे – म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 5 हजार 863 सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी सोमवारपर्यंत (दि.30) मुदत होती. यामुदतीमध्ये सुमारे 75 हजार नागरिकांनी घरांसाठी अर्ज केले आहेत.

दरम्यान, यातील 51 हजार 600 नागरिकांनी अनामत रक्कम भरली आहे. दरम्यान अनामत रक्कम भरण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि.31) अंतिम मुदत आहे. अनामत रक्कम भरणाऱ्यांनाच सोडतीमध्ये सहभागी होता येणार असून अनामत रक्कम भरण्यासाठी म्हाडाकडून आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

म्हाडा पुणे विभागाने गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील 431 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344 सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील 2 हजार 445 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 445 सदनिका अशा एकूण 5 हजार 863 सदनिकांसाठी सोडत जाहीर केली आहे.