कुवेतमधील 8 लाख भरतीयांचे वास्तव्य धोक्‍यात

दुबई- कुवेतमध्ये कार्यरत असलेल्या विदेशी कामगारांची संख्या टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठीचे विधेयक तेथील संसदीय समितीपुढे विचाराधीन आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास कुवेतमधील सुमारे 8 लाख भारतीयांना तेथून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे.

कुवेतमधील स्थानिक प्रसार माध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. “एक्‍स्पाट कोटा बिल’ नावाचे हे विधेयक घटनात्मक आहे, असा विचार नॅशनल असेंब्लीच्या कायदेशीर आणि प्रशासकीय समितीने केला आहे.

या विधेयकानुसार कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात तेथील भारतीयांची संख्या 15 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असता कामा नये. सध्या कुवेतमध्ये अन्य विदेशी नागरिकांपेक्षा भारतीयांची संख्या सर्वाधिक म्हणजे 14 लाख 50 हजार इतकी आहे.

या विधेयकानुसार 8 लाख भारतीयांना तेथून बाहेर जावे लागणार आहे. कुवेतची सध्याची लोकसंख्या 43 लाख इतकी असून त्यातील कुवेती नागरिक 13 लाख आणि विदेशातील नागरिकांची संख्या 30 लाख आहे.

करोनाची साथ आणि तेलाच्या घसरलेल्या किंमती यामुळे विदेशी लोकांची संख्या कमी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होते आहे. ही विदेशी नागरिकांची संख्या 70 टक्‍क्‍यांवरून 30 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यात कुवेतचे पंतप्रधान शेख सबाह अल खालिद अल सबाह यांनी मांडला होता.

Leave a Comment