nagar | निवडणूक प्रशिक्षणास ९१४ कर्मचार्यांनी फिरवली पाठ

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. या पहिल्या प्रशिक्षणाला दांडी मारणार्‍या ९१४ कर्मचार्‍यांना लोकप्रतिनिधींत्व अधिनियम १९५१ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रविवारी निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पारपडले. या प्रशिक्षणासाठी नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ३ हजार ७३४ मतदान केंद्रावरील १८ हजार ६८० कर्मचार्‍यांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले होते. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी राहुरीच्या प्रशिक्षणास भेट देत मार्गदर्शन केले.

नगर विधानसभा मतदारसंघाच्या प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल पाटील, उप विभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नगर शहरातील नंदनवन लॉन्स व भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय येथे दोन सत्रामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्रामध्ये आयोजित प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी करावयाची कार्यवाही, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था आदीबाबतही माहिती देण्यात आली. तर दुसर्‍या सत्रात भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालय ईव्हीएम हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी मतदान प्रक्रियेबाबत तयार केलेल्या व्हिडीओचे प्रसारणही या प्रशिक्षणादरम्यान करण्यात आले. मतदान यंत्र हाताळणी बाबत केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे अजुन दोन प्रशिक्षण होणार असुन नियुक्त अधिकारी, कर्मचार्‍यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहून निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया समजुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी उपस्थितांना केले आहे.

तालुकानिहाय गैरहज कर्मचार्यांची आकडेवारी
नगर ७१, पारनेर ४९, राहुरी ६८, नेवासा ८६, कोपरगाव १३०, शिर्डी ६०, संगमनेर ९६, अकोले ५३, शेवगाव ४५, श्रीगोंदा ७२, कर्जत आणि जामखेड १३०, असे एकूण ९१४ कर्मचारी गैरहजर असल्याचे आकडेवारी मध्ये समोर आले आहे.