nagar | भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यतेची घोषणा

नगर, (प्रतिनिधी) – नगर शहराचा ५३४ वा स्थापना दिन. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रसिक ग्रुपच्या वतीने पंच शताब्दीचा वारसा लाभलेल्या शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी एका संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन भुईकोट किल्ल्या जवळील आय लव्ह नगर गार्डन येथे केले होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यता मिळाल्याची घोषणा करत नगरकरांना अनोखी भेट दिली.

रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या अनोख्या कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त नगरवासियांच्यावतीने विशेष नागरी सत्कार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आ.संग्राम जगताप, मनापा आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मेजर चंद्रशेखर, कोहिनूरच्या संचालिका नीता गांधी, चिंतामण रामचंद्र देशमुख ज्वेलर्सचे संचालक निळकंठ देशमुख, डॉ.विद्युल्लता शेखर पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सह लष्करी, पोलीस अधिकारी, पत्रकार व विविध क्षेत्रातिल नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

शहराच्या ५३४ व्या स्थापना दिनानिमित्त उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. या कार्यक्रमास चिंतामण रामचंद्र देशमुख ज्वेलर्सचे सहकार्य लाभले. एलसीबीचे पोलीस अधीक्षक दिनेश अहिरे यांचाही सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकास प्रकल्पासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नुकतीच ९५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळायचे जाहीर करून नगरकरांना अनोखी भेट दिली. ते म्हणाले, शहराच्या विकासात भर घालत येथे काम करताना खूप समाधान व अभिमान मला वाटतो.

अनेक अडचणींवर मात करत जिल्ह्याचे व नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकासाचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सोडवण्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिवांबरोबर बैठक होवून त्यात ९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे.

राज्य सरकार मार्फत राबण्याण्याचा सामंजस्य कराराचाही पहिला टप्पा झाला आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामास सुरवात होईल. हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. बाहेरील पर्यटक नगरमध्ये थांबून शहराच्या पर्यटनास चालना मिळण्यासाठी व शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी आपल्या पोलीस खात्यातील प्रदीर्घ कारकीर्दीची शिदोरी उलगडत आलेले बरे वाईट अनुभावंना व केलेल्या मोठमोठ्या कारवायांना उजाळा दिला. नगरमध्ये काम करताना अनेक गुन्हेगारांवर कारवाई करत अनेक गुन्ह्यांचा शोध लावता आला त्यामुळे येथील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली. या वर्दीने मला प्रतिष्ठा दिली. सर्वात मोठी समाजसेवा करण्याची संधी या खाकीने दिली आहे, असे सांगून स्व लिखित चारोळीतून सर्वांचे आभार मानले.