धक्कादायक ! गेम खेळताना 14 वर्षाच्या मुलाचा इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

मुंबई – मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ भागातील एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून खाली पडून एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंत ओएसिस असे या इमारतीचे नाव आहे. तर मृत मुलाचे नाव कृष्णा अग्रवाल असून तो अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अनुपम अगरवाल यांचा हा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच तो आईसोबत मुंबईत सुट्टीसाठी आला होता. मात्र शुक्रवारी इमारतीवरून पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मुलाला महापालिकेच्या विलेपार्ले कूपर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर तो मुलगा डिप्रेशनमध्ये असल्याचे समजले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा मुलगा गेम खेळत असताना टास्क पूर्ण करण्यासाठी डिप्रेशनमध्ये गेला असावा आणि त्यातच इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र मुलाने 22 मजली इमारतीवरुन उडी मारली की त्याला कोणी ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

सध्या या मुलाचा आयफोन ताब्यात घेतला असून यात खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गेम असल्याचे समोर आले आहे. मुलाच्या वडिलांचे नाव अनुपम अग्रवाल असून ते अमेरिकेत वास्तव्याला आहेत. तेथील ते प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत डॉक्टर अग्रवाल पत्नी आणि मुलगा, मुलीला मुंबईला फिरायला घेऊन येतात. यंदाही ते सुट्टीसाठी मुंबईत आले होते. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरातील वसंत ओएसिस या इमारतीत ते राहत होते. सध्या या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.