‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ ! विरोधकांवरील कारवाईच्‍या निषेधार्थ दिल्‍लीत महा रॅली

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केल्‍या जात असलेल्‍या कारवाईच्‍या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडी रविवारी, 31 मार्च रोजी दिल्लीत महा रॅली काढणार आहे. या रॅलीचा ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ असा नारा असणार आहे. यामध्ये देशातील सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी हे देखील रॅलीत सहभागी होणार आहेत. याशिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन,, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन हे देखील या रॅलीला येणार आहेत.

दिल्‍लीतील रामलीला मैदानावरून रॅली काढण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे. ही महारॅली यशस्वी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली, हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय भान आणि दिल्ली आणि हरियाणाचे पक्ष प्रभारी दीपक बाबरिया आणि इतर काही नेते यात सहभागी झाले होते.

केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक आणि कॉंग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्याच्या विरोधात ही ‘महा रॅली’ काढण्यात येत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीसाठी तृणमूल काँग्रेस आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर तृणमूलने विरोधी आघाडीपासून अंतर ठेवले आहे. परंतु सत्ताधारी भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात ते सहभाग नोंदविणार आहेत.