पुणे जिल्हा | उन्हात उभ्या असलेल्या दुचाकीला लागली अचानक आग

मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता. आंबेगाव) येथे मुळेवाडी रोडलगत दौलत फॅमिली पान हाऊस शेजारी उन्हात उभी असलेल्या दुचाकीने रविवार, दि. २८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही वेळ खळबळ उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की मारुती कांताराम ढेरंगे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची करिझ्मा ही दुचाकी मंचर येथिल शिवबा या कपड्याच्या दुकानासमोर लावली होती. ढेरंगे हे दुकानात बसले होते.

त्यानंतर काही वेळानंतर अचानक त्यांना गाडीच्या खालील बाजूस आग लागल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी तात्काळ आग विझवण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्वप्निल मोरे, सुरेश पवार, सिद्धेश मिंडे, निखिल बाणखेले यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत पाण्याने आग विझवली.

या आगीत दुचाकी मोठ्या प्रमाणात जळाल्याने दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने तापमान वाढत आहे. त्यामुळे उन्हात उभे असलेल्या दुचाकी चार चाकी गाड्या उन्हामध्ये तापून अचानक पेट घेऊ शकतात. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिकांनी आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने शक्यतो उन्हात लावू नये. असे आवाहन पोलीस प्रशासने केले आहे.