पिंपरी | आचारसंहितेमुळे त्‍या खतांच्‍या विक्रीला ब्रेक

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र खतांच्या पोत्यावर छापण्यात आलेले आहे. त्यामुळे त्या खतांची पोती विकण्यावर मर्यादा आल्या आहेत. खत विक्रेत्यांनी लाखो रुपये भरून खते खरेदी केली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे खतांचा मोठा साठा गोदामात शिल्लक आहे. त्यातच शेतकऱ्यांकडून पिकांसाठी खताची मागणी होत आहे.

मात्र, पंतप्रधानांच्या फोटोमुळे ती खतांचे पोती विकता येत नाहीत. त्यातच ते छायाचित्र झाकण्यासाठी दुकानदारांकडे स्टिकर उपलब्ध नाहीत. बाजारातून अशी स्टिकर विकत घेऊन पोत्यांना लावणे दुकानदारांना परवडत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे तर शेतकऱ्याना खंतटंचाईलासामोरे जावे लागत आहे.

अधिकाऱ्यांनी मागवले मार्गदर्शन
सध्या बाजारपेठेत इफ्को कंपनीसह इतरही काही कंपन्यांच्या खतांच्या पोत्यावर मोदींचे छायाचित्र आहे. बाजारपेठेत इफ्को कंपनीच्या खतांचा पुरवठा जास्त असतो. अनेक विक्रेत्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच खतांची खरेदी करून ठेवली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या शेकडो पोत्यावर ते छायाचित्र आहे. त्यामुळे त्याला शेतकऱ्यांची मागणी असूनही आचारसंहितेमुळे ते विकता येत नसल्याच्या विक्रेत्यांच्या तक्रारी आहेत.

शेतकरी-दुकानदारांची वादावादी
लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून शासकीय जाहिराती, प्रचार, प्रसिद्धी कायद्याच्या कचाट्यात सापडली. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो आहे. इफ्को कंपनीच्या रासायनिक खतांच्या प्रत्येक बॅगवर प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापलेले आहे.

अशा प्रकारचे छायाचित्र असल्याने या खतांची विक्री अनेक विक्रेत्यांनी स्वतःहून थांबवली आहे. हा प्रकार आचारसंहिता भंगाचा मुद्दा होण्याच्या शक्यतेने संभाव्य कारवाई टाळण्यासाठी विक्रेते खतांची विक्री करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना इफ्कोचा युरिया, भारत युरिया, भारत डीएपी आदी खते उपलब्ध असूनही देता येत नाही. त्यामुळे शेतकरी आणि दुकानदारांची वादावादीही होत आहे.

कोणाला विचारून छायाचित्र छापले
केंद्र सरकारच्या खत विभागाने देशात ‘भारत’ या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिलेली आहे. त्यानुसार गेल्या वर्षीपासून कंपन्यांकडून ‘भारत’ नावाखाली खतपुरवठा होत आहे. खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे.

त्यामुळे त्याच्या विक्रीसंदर्भात काय करावे असा प्रश्न पडला आहे. स्टिकर लावून छायाचित्र झाकायचे असेल तर संबंधित कंपन्यांनीच स्टिकर पुरवावीत, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, कंपन्यांकडून त्यांना स्टीकर देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे फोटो कोणाला विचारून छापले, असा सवाल विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.