दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या दाम्पत्याची गुजरातवापसी

खंडणी दिल्याने अपहरणकर्त्यांकडून सुटका
अहमदाबाद  – अमेरिकेत जाण्याच्या ईर्षेने पछाडलेल्या आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या तरूण दाम्पत्याची बुधवारी गुजरातमध्ये सुखरूप वापसी झाली. अपहरणकर्त्यांना 10 लाख रूपये खंडणी दिल्याने त्यांची सुटका झाली. मात्र, ओलीस असताना भयंकर छळ झाल्याने तरूण पतीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

गुजरातच्या अहमदाबादेत राहणाऱ्या पंकज आणि निशा पटेल या दाम्पत्याने अमेरिकेत स्थायिक होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, अमेरिकेत पोहचणे सोपे नसल्याने त्यांनी त्या देशात अवैध शिरकाव करण्याचे ठरवले. त्यातून ते काही एजंटांच्या संपर्कात आले. एजंटांच्या सूचनेवरून पटेल दाम्पत्य इराणमध्ये पोहचले. तेथील तेहरान विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या दाम्पत्याची व्यवस्था काही जणांनी हॉटेलमध्ये केली. मात्र, तिथेच त्यांना ओलीस ठेवण्यात आले. पाकिस्तानी एजंट आणि त्याचे साथीदार त्यामध्ये सामील असल्याचे समजते.
पटेल दाम्पत्याच्या सुटकेसाठी 15 लाख रूपये खंडणीची मागणी अपहरणकर्त्यांकडून करण्यात आली.

त्यासाठी पंकज यांच्या कुटूंबीयांवर दबाव टाकण्याच्या उद्देशातून त्यांना काही व्हिडीओ पाठवण्यात आले. त्यामध्ये पंकज यांच्या पाठीवर ब्लेडने वार करण्यात आल्याचे आणि त्यांना बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे दिसते. ते व्हिडीओ पाहून हादरलेल्या पटेल कुटूंबीयांनी अपहरणकर्त्यांना खंडणी देण्याचा निर्णय घेतला. तडजोडीतून 10 लाख रूपये इतकी खंडणीची रक्कम निश्‍चित करण्यात आली. ती पटेल दाम्पत्याला इराणला पाठवणाऱ्या एजंटांच्या माध्यमातून हवालामार्गे अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचवण्यात आली. त्यामुळे त्या दाम्पत्याची सुटका झाली.

गुजरातमध्ये पोहचल्यानंतर पंकज आणि निशाला (दोघांचेही वय 29 वर्षे) उपचारासाठी एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याने पंकज अद्याप सावरलेले नाहीत. अजूनही इराणमध्येच असल्याचे वाटून ते अक्षरश: धाय मोकलून रडतात. गर्भवती असणाऱ्या निशाला अपहरणकर्त्यांनी कुठलाही त्रास दिला नसल्याचे समजते.