भारती विद्यापीठात सुरू होणार ‘पेंटिंग’चा अभ्यासक्रम

पुणे – पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ या महाविद्यालयात रेखा व रंगकला (बीएफए पेंटिंग) हा नवीन पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

भारती विद्यापीठात कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ ही विनाअनुदानित महाविद्यालय कार्यरत आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या सोयी सुविधांची तपासणी कला संचालनालयकडून करण्यात आली होती. त्याबाबतचा प्रस्ताव शिफारशींसह राज्य शासनाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात मान्यता देत असल्याचे राज्य शासनाकडून आज स्पष्ट करण्यात आले.

हा अभ्यासक्रम कायम विनाअनुदानित तत्वावर असून, प्रवेशाची क्षमता 30 इतकी राहील. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमानुसार सर्व पूर्तता करणे आवश्‍यक आहे. या अभ्यासक्रमाच्या संलग्नीकरणासाठी महाविद्यालयाने संबंधित विद्यापीठाची मान्यताघेणे आवश्‍यक राहील. प्रवेश नियमानुसार करावेत. तसेच शुल्क नियामक प्राधिकारणाने निश्‍चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त आकारता येणार नाही. तंत्रशिक्षण परिषदेने निश्‍चित केलेली अर्हता धारण केलेल्या प्राध्यापकांची नियुक्‍ती करणे अनिवार्य राहील, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.