पिंपरी | रॅगिंगमुळे अपंग विद्यार्थिनीचा जीव आला धोक्‍यात

पिंपरी, (प्रतिनिधी) – रॅगिंग होऊ नये म्‍हणून शासनाने कडक कायदे केले आहेत. मात्र तरीही रॅगिंगचे हे प्रकार सुरूच असून महाविद्यालय देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. लोणावळा येथील एका नामांकित महाविद्यालयात तीन मुलींनी एका अपंग मुलीवर रॅगिंग केले. रॅगिंग सहन न झाल्‍याने तिला ब्रेनस्‍ट्रोक आला असून सध्‍या ती मुलगी पिंपरी चिंचवड शहरातील एका बड्या रुग्‍णालयातील अतिदक्षता विभागात व्‍हॅन्‍टिलेटरवर आहे.

याबाबत मुलीच्‍या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस आणि महिला आयोगाकडे न्‍यायासाठी दाद मागितली असून चौकशी सुरू असल्‍याचे सरकारी उत्‍तर पोलिसांनी दिले.

याबाबत सविस्‍तर माहिती अशी की, सातारा, तालुक्‍यातील एक अपंग मुलगी लोणावळा येथील नामांकित महाविद्यायात बीबीए/सीए शिक्षण घेत असून सध्‍या ती दुसऱ्या वर्षाला आहे. ती मुलींच्‍या वसतीगृहात राहत असून तिच्‍याच खोलीत राहणाऱ्या तीन मुलींनी तिच्‍यावर रॅगिग करत होत्‍या. तिचे साहित्‍य व कागदपत्र फेकून देणे, तिला बाथरूममध्‍ये कोंडून ठेवणे, चाकू घेऊन तिच्‍या मागे लागणे, अशा घटना वारंवार घडल्‍या आहेत. या घटनांमध्‍ये तिला दोनवेळा चाकू लागला आहे.

रॅगिंगबाबत तिने आपल्‍या वडिलांना सांगितल्‍यावर वडिलांनी रॅगिंग करणाऱ्या मुलीच्‍या पालकांशी संवाद साधला. मात्र त्‍यांनीही मी फौजी आहे. तुम्‍हाला काय करायचे ते करा, अशी उलट उत्तरे दिली. पीडित मुलगी तक्रार करण्‍यासाठी प्रिन्‍सिपलकडे गेली असता ’तू तक्रार करू नकोस नाहीतर त्‍या मुलींचे करिअर खराब होईल, असे सांगून तिला रोखले.

वारंवार होणारा त्रास असह्य झाल्‍याने त्‍या मुलीला ब्रेनस्ट्रोक आल्‍याचे तिच्‍या वडिलांनी महिला आयोग व लोणावळा ग्रामीण पोलिसांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे. सध्‍या त्‍या मुलीवर पिंपरी चिंचवड शहरतील एका बड्या रुग्‍णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ती सध्‍या व्‍हॅन्‍टिलेटरवर आहे. आपल्‍या मुलीला न्‍याय मिळावा यासाठी तिच्‍या वडिलांनी २१ मार्च रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस व २३ मार्च रोजी महिला आयोगाला पत्र पाठविले आहे. मात्र अद्याप त्‍यांच्‍या तक्रारीची दखल कोणीच घेतलेली नाही.

मुलीच्‍या वडिलांचा तक्रार अर्ज प्राप्‍त झाला आहे. याबाबत आमचे अधिकारी चौकशी करीत आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. किशोर धुमाळ, वरिष्‍ठ निरीक्षक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे