ढाक्‍यात फॅक्‍टरीला लागलेल्या आगीत 52 जण ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. एका 6 मजली फॅक्‍टरीला आग लागल्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 30 जण जखमी झाले असून अजूनही मोठ्या संख्येने कामगार बेपत्ता असल्याची शक्‍यता या दुर्घटनेतून बचावलेल्या काही मजुरांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आग लागल्यानंतर एकच भयकंप उडाला. त्यातून आपला जीव वाचविण्यासाठी अनेक कामगारांनी इमारतीवरून खाली उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातही अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापासून वरील सर्व मजल्यांना आग लागली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साधारण 5 वाजेदरम्यान रुपगंज भागात एका फूट अँड बेवरेज फॅक्‍टरीला आग लागली.

शुक्रवारी दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानंतर पोलीस आणि फायर डिपार्टमेंटरने दिलेल्या माहितीनुसार, 25 जणांना वाचविण्यात यश आले आहे. ज्यांना वाचवण्यात आले त्यांनी सांगितलेला अनुभव भयावह आहे. तेथे अडकलेले कोणीच वाचू शकत नाही, असे सुदैवी ठरलेल्या या कामगरांचे म्हणणे होते.

एका मजुराने सांगितले की, जेव्हा आग लागली तेव्हा फॅक्‍टरीत अनेक मजुर होते. बांगलादेशात सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहेत व त्यात गरीब कामगारांना प्राणास मुकावे लागते आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी महिन्यात ढाका येथे काही अपार्टमेंटला आग लागल्याचे वृत्त समोर आले होते, यामध्ये तब्बल 70 जणांचा मृत्यू झाला होता.