पुणे जिल्हा | भात खाचरात फुलविला सूर्यफुलाचा मळा

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगात प्रामुख्याने भात शेती केली जाते. नंतर उन्हाळी कोणतीही पीक घेतले जात नाही. परंतु वाठार (ता.भोर) येथील प्रगतशील शेतकरी भरत राघु खाटपे यांनी आधुनिकतेची कास धरून व्यापारी तत्त्वावर शेती करणे अवलंबले यासाठी त्यांनी आपल्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये दोन जानेवारी २०२४ ला सूर्यफुलाची टोकन पद्धतीने लागवड केली.

टोकन करण्यापूर्वी भाताचे पीक काढल्यानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेताची भात खाचऱ्याची उभी आणि आडवी नांगरणी केली. त्यानंतर दोन पाळी देऊन दोन ट्रॉली शेणखत दिले. यानंतर शेतामध्ये सारे तयार करून पाट पाण्याचा वापर करून फुललेला सूर्यफुलाचा मळा पुणे महाड या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा मोहित करीत आहे.

सूर्यफुलाची लागवड करताना ६० सें.मी. बाय ३० सें.मी. अंतरावर टोकण केले. पेरणीनंतर १५ दिवसांनी दोन रोपातील अंतर ३० सें.मी. ठेऊन विरळणी आणि खुरपणी केल्याने तणांचा नाश झाल्याने पीक जोमदार आले आहे. पहिली कोळपणी पेरणीनंतर २५ दिवसांनी व दुसरी कोळपणी ४० दिवसांनी केली. दर आठ दिवसांनी पाणी दिले. रासायनिक खतांचा अत्यल्प वापर केला.

त्यात कोरडवाहू पिकास गांडूळ खत,शेणखत तसेच २० किलो नत्र, ५ किलो स्फुरद आणि ५ किलो पालाश दिले, ५ किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतात मिसळून दिले.विषाणूजन्य रोग हा रस शोषणाऱ्या फुलकिड्यांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रिड १७.८% एस.एल. २ मिली / १० लीटर पाणी या प्रमाणात पेरणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने तीन वेळा फवारण्या केली. साधारणता७० हजार रुपये उत्पन्न होण्याची आशा आहे.

आमची भात शेती आहे. भात पीक घेतल्यानंतर कोणतेच पीक घेतले जात नाही.परंतु व्यापारी तत्त्वावर सूर्यफूल हे पीक प्रायोगिक तत्त्वावर घेतले आहे. या पिकाला उतारा चांगला असल्याने आर्थिक उत्पन्न चांगले मिळू शकते.-भरत खाटपे, प्रयोगशील शेतकरी, वाठार (ता.भोर)