बोगस सातबारा उताऱ्यांच्या आधारे घेतले दीड कोटीचे कर्ज

कुडाळ – बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ, ता. जावळी येथील शाखेची सव्वा ते दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जावळी तालुक्‍यातील 49 जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाखाधिकारी सरोजकुमार भगत यांनी फिर्याद नोंदवली आहे.

या 49 संशयितांनी बोगस सातबारे उतारे तयार करून, तलाठ्याच्या खोट्या सह्या केल्या. खोटे शिक्‍के वापरून, हे उतारे खरे असल्याचे बॅंकेला सांगितले. हे उतारे ते बॅंकेला सादर करून, त्या आधारे शेतजमिनीवर कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड केली नाही आणि संगनमताने बॅंकेची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद भगत यांनी मेढा न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने भादंवि कलम 156 (3) अन्वये प्रथम खबर दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तपास करत आहेत.

सचिन उत्तमराव शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब जगन्नाथ आम्राळे, सचिन लक्ष्मण जाधव, सचिन बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण शहाबाद (आखाडे), प्रवीण शिवाजी यादव (आंबेघर), कांता चंद्रकांत बेलोशे (बेलोशी), महादेव मदने, आदिनाथ लोहार, संगम जरे, छाया दीपक जाधव (हुमगाव), संतोष शिवाजी पवार, संतोष बाळासाहेब कदम, सयाजी बाळासाहेब कदम, जयश्री सयाजी कदम (कुडाळ), शिवाजी शंकर करंदकर, श्रीराम शंकर करंदकर, मच्छिंद्र शंकर करंदकर (रानगेघर), अक्षय भाऊसाहेब दुर्गावळे, दिगंबर विठ्ठल गोळे, लीला विजय दुर्गावळे, अक्षय अशोक पवार (सनपाने), विकास तानाजी नवले, भारती तानाजी नवले, वैभव तानाजी नवले, तानाजी आनंदराव नवले,संताजी दत्तात्रय नवले (सरताळे), जितेंद्र यशवंत मेंगळे, नितीन यशवंत मेंगळे (शेते), प्रवीण शामराव परामणे (सोमर्डी), नवनाथ जगन्नाथ रांजणे (वहागाव), सुधीर बबन यादव (आंबेघर), अविनाश गायकवाड (इंदवली) अशी संशयितांची नावे आहेत. या संशयितांनी 2014 सालापासून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.